संघ कार्यालयावर मोर्चा नेणाऱ्यांना बेदम मारहाण
By admin | Published: February 2, 2016 02:55 AM2016-02-02T02:55:40+5:302016-02-02T02:55:40+5:30
रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा नेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्ली पोलीस अंत्यत क्रूर व अमानुष मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सोशल
नवी दिल्ली : रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा नेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्ली पोलीस अंत्यत क्रूर व अमानुष मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. आम आदमी पार्टीने सोमवारी हा व्हिडिओ जारी केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत गणवेशधारी पोलिसांसोबतच काही साध्या वेषातील व्यक्ती आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करीत असताना दिसत आहे. यावेळी दोन पत्रकारांनाही पोलिसांनी मारहाण केल्याचे वृत्त आहे.
आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने दिल्ली पोलिसांच्या या निर्दयी कारवाईवर तीव्र शब्दांत निंदा केली आहे. विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांमध्ये भाजपा व संघाचे कार्यकर्तेही असल्याचा दावा आप नेते संजय सिन्हा यांनी केला असून काँग्रेसने या प्रकरणातील दोषींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान हे प्रकरण तापण्याची चिन्हे दिसताच, दिल्ली पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
३० जानेवारीला या आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलो असता, पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप दोन पत्रकारांनी केला आहे. आम आदमी पार्टीने जारी केलेल्या व्हिडिओही पोलीस कर्मचारी आंदोलक विद्यार्थ्यांना केवळ लाठीमार नाही तर महिला आंदोलकांचे केस धरून त्यांना ओढत असल्याचे आणि त्यांना जमिनीवर ढकलून देत असल्याचे दिसत आहे. ३० जानेवारीला दोन डाव्या संघटनांनी रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन केले होते. या आंदोलकांनी दिल्लीतील झंडेवाला येथील रा.स्व. संघाच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवताच, पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार सुरू केला. व्हिडिओत काही साध्या वेशातील व्यक्तीही आंदोलक विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करताना दिसत आहेत. या साध्या वेशातील व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
दिल्ली पोलीस भाजपा-रा.स्व.संघाची ‘प्रायव्हेट आर्मी’ बनले आहे. भाजपा व रा.स्व. संघाला विरोध करणाऱ्या प्रत्येकाला धमकावण्याचे आणि त्यास धडा शिकवण्याचे काम सध्या दिल्ली पोलिसांनी आरंभले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष कारवाईची मी निंदा करतो.
-अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री