साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे २५२५ कोटी थकवले
By admin | Published: February 25, 2015 01:55 AM2015-02-25T01:55:38+5:302015-02-25T01:55:38+5:30
ऊस उत्पादकांना वेळेत मालाची उचल देण्यासाठी केंद्र सरकारकडून नाममात्र व्याजदरांवर हजारो कोटींचे कर्ज लाटूनही अनेक साखर कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना उचलेची रक्कम दिलेली नाही़
नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
ऊस उत्पादकांना वेळेत मालाची उचल देण्यासाठी केंद्र सरकारकडून नाममात्र व्याजदरांवर हजारो कोटींचे कर्ज लाटूनही अनेक साखर कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना उचलेची रक्कम दिलेली नाही़
खासदार राजू शेट्टी आणि कोथापल्ली गीता यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल खुद्द ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीच ही माहिती दिली आहे़ शेतकऱ्यांना वेळेत उचल देण्याच्या नावावर देशभरातील साखर कारखान्यांनी ६,६५५़१० कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे़ मात्र असे असूनही २०१३-१४ च्या गळीत हंगामात खरेदी केलेल्या उसाची २५२५़८७ कोटी रुपयांची थकबाकी अद्यापही साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना दिलेली नाही़
विशेष म्हणजे स्वस्त व्याज दरावर कर्ज घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे़ ऊस उत्पादकांना उचल देण्यासाठी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना २०७० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज मंजूर केले गेले आहे़ यापैकी २०४४ कोटी रुपयांच्या कर्जाचे प्रत्यक्ष वाटपही झाले आहे़ महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशच्या साखर कारखान्यांनाही सर्वाधिक १९५५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे़ यापैकी १८६४ कोटींच्या कर्जाचे वाटप झाले आहे़
दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जानेवारी २०१४ पासून साखर कारखान्यांना स्वस्त व्याजदराने कर्जाचे वाटप सुरू आहे़ यासाठी स्टेट बँक आॅफ इंडियाला नोडल बँक बनविण्यात आले आहे़ या कर्जाचा वापर शेतकऱ्यांना त्यांची थकबाकी देण्याशिवाय अन्य दुसऱ्या कामासाठी करता येणार नाही, अशी मुख्य अट आहे़ मात्र असे असूनही अनेक शेतकऱ्यांना आपल्या मालाचा परतावा मिळालेला नाही़ ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ अंतर्गत ऊस उत्पादकांना त्यांच्या मालाची किंमत वेळेत चुकती केली जावी, अशी तरतूद आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी राज्य सरकारची जबाबदारी आहे़