साखर कारखान्यांनी जीएसटीसाठी सिद्ध व्हावे
By admin | Published: June 10, 2017 12:13 AM2017-06-10T00:13:20+5:302017-06-10T00:13:20+5:30
देशातील साखर उद्योगावर जीएसटीचा मोठा प्रभाव पडणार असून, तो नेमका काय व कसा असेल, हे बारकाईने समजावून घेऊन
सुरेश भटेवरा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील साखर उद्योगावर जीएसटीचा मोठा प्रभाव पडणार असून, तो नेमका काय व कसा असेल, हे बारकाईने समजावून घेऊन या नव्या करप्रणालीसाठी सहकारी कारखान्यांनी सिद्ध व्हावे, असे आवाहन नॅशनल फेडरेशन आॅफ को-आॅपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी २६२ सहकारी साखर कारखान्यांना व ९ राज्य सहकारी साखर संघांना केले आहे.
जीएसटीची १ जुलै २0१७पासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे सर्व साखर कारखान्यांना त्यासाठी नियोजित वेळेत, व्यवसायाची भौगोलिक व्याप्ती व क्षेत्रासह बदल करून घ्यावे लागतील, असे ते म्हणाले.
सहकारी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाला उद्देशून लिहिलेल्या पत्रात दिलीप वळसे पाटलांंनी नमूद केले आहे की, पुढील जीएसटीचा साखर उद्योगावर थेट परिणाम संभवतो. साखर कारखाने : (एक्साइज ड्युटी, साखरेवरील सेस, आॅक्ट्रॉय, व्हॅट/ विक्रीकर) मोलॅसिस : (एक्साइज ड्युटी रुपये ७५0/- प्रतिटन, प्रशासकीय खर्च, आॅक्ट्रॉय, व्हॅट/ विक्रीकर), बायोगॅस (एक्साइज ड्युटी, आॅक्ट्रॉय, व्हॅट/ विक्रीकर) तसेच ऊस : (खरेदी कर, प्रवेश कर, वाहतुकीवरील सर्व्हिस टॅक्स, व अन्य कर), साखरेचे पॅकिंग साहित्य, रसायने, दुरुस्ती व यंत्रांची देखभाल व यंत्रसामग्रीसाठी भांडवली खरेदी (एक्साइज ड्युटी, आॅक्ट्रॉय, व्हॅट/ विक्रीकर व राज्य सरकारचे अन्य कर) याप्रकारे करभरणा करीत असतात.
या उद्योगावर एक्साइज ड्युटी, साखरेवरील सेस, आॅक्ट्रॉय इत्यादी कर होते. त्याऐवजी आता केवळ जीएसटी भरावा लागेल, हे लक्षात घेऊ न त्याचे सारे तपशील कारखाना व्यवस्थापनाने वेळेपूर्वी समजावून घ्यावेत.