साखर महागण्याची शक्यता; सेस लावण्यासंदर्भात मंत्रिगटाची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 04:15 AM2018-04-24T04:15:29+5:302018-04-24T04:15:29+5:30
साखरेवर सेस लावल्यानंतर किरकोळ बाजारात सर्वसामान्यांना साखर महाग मिळू शकते
साखरेवर उपकर लावण्याचा विचार
टेकचंद सोनावणे ।
नवी दिल्ली : वाढीव उत्पादनामुळे संकटात सापडलेल्या साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी साखरेवर सेस (उपकर) लावण्यासंबंधी केंद्रीय मंत्रीगटाच्या सोमवारी बैठकीत चर्चा झाली. इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यासाठी त्यावरील जीएसटी कमी करण्याचाही विचार झाला. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान व पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी बैठकीत उपस्थित होते. बैठकीतील निर्णयांची शिफारस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात येईल.
सेसमधून जमा होणाऱ्या रकमेतून शेतकºयांना थकबाकी देता येईल, अशी भूमिका पासवान यांनी घेतली. तीनही मंत्र्यांचे बैठकीत एकमत झाल्याने लवकरच सर्व प्रस्तावांना केंद्रीय मंत्रिमडळाची मंजुरी देण्यात येईल. उत्पादक शेतकºयांना १९०० कोटी रुपयांची थकबाकी देण्यावर बैठकीत चर्चा झाल्याचा दावा सूत्रांनी केला. त्यासाठीच साखरेवर 'सेस' लावण्यात येण्याची शक्यता आहे.
अंदाज चुकल्याने उद्योग संकटात
देशातील वीस लाख टन साखरेच्यानिर्यातीसाठी तातडीने निर्णय घेण्यावरही यावेळी चर्चा झाली. यंदा उत्पादनाचा अंदाज चुकल्याने साखर उद्योग संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी देशात २५० ते २६० लाख टन उत्पादन होत असते. यंदा त्यात थेट चाळीस लाख टनांची भर पडली. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशातील साखर कारखानदार, शेतकºयांनी केंद्राला हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. चाळीस लाख टन साखरेचा बफर स्टॉक करून निर्यात करण्याची मागणी शेतकºयांची आहे. निर्यातीच्या निर्णयासाठी वाणिज्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाºयांचे मत मंत्रीगटाने जाणून घेतले.
गोडवा महागणार
साखरेवर सेस लावल्यानंतर किरकोळ बाजारात सर्वसामान्यांना साखर महाग मिळू शकते?