देशात २६० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 10:30 PM2020-02-04T22:30:00+5:302020-02-04T22:30:01+5:30
उत्तरप्रदेश यंदाही साखर साखर उत्पादनात अव्वल
पुणे : अतिवृष्टी, गेल्यावर्षीचा दुष्काळ याचा फटका यंदाच्या ऊस गाळप हंगामावर झाला असून, देशातील साखर उत्पादनात यंदा २६० लाख टनांपर्यंत घट होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७० लाख टनांनी साखर उत्पादन घटणार असल्याचा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) वर्तविला आहे.
गेल्यावर्षी देशात ३३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यातील,उत्तरप्रदेशामधे १२० व महाराष्ट्रात १०७ लाख टन साखर उत्पादित झाली होती. यंदा महाराष्ट्र व कर्नाटकातील ऊस गाळप हंगामाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील साखर उत्पादन यंदा निम्म्याने खाली येणार आहे. देशातील ४४६ साखर कारखान्यांनी जानेवारी-२०२० अखेरीस १४१.१२ लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्यावर्षी याच काळामधे ५२० साखर कारखान्यांनी १८५.५९ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते.
यंदाच्या हंगामात देशामधे २६० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. उसाच्या रसापासून आणि बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीमुळे साडेआठ लाख साखरेची घट होईल. गेल्या वर्षीपेक्षा ७० लाख टनांनी साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. जानेवारी २०१९च्या तुलनेत यंदा ४४.५ लाख टन साखर उत्पादन घटले आहे.
उत्तरप्रदेशमधे यंदाही सर्वाधिक साखर उत्पादित होईल. येथील ११९ साखर कारखान्यांनी ५४.९६ लाख टन साखर ३१ जानेवारी २०२० पर्यंत उत्पादित केली होती. गेल्यावर्षी याच काळामधे ११७ कारखान्यांनी ५२.८६ साख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. महाराष्ट्रातील १४३ कारखान्यांनी ३४.६४ लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्यावर्षी याच काळामधे महाराष्ट्रात ७१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.
कर्नाटकामधील ६३ कारखान्यांनी २७.९४ लाख टन साखर उत्पादित केली असून, गेल्यावर्षी ३३.७६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तमिळनाडूमधे २१ कारखान्यांनी २.०५, गुजरात मधील १५ कारखान्यांनी ४.८७, आंध्रप्रदेश व तेलंगणातील १८ साखर कारखान्यांनी २.३४ लाख टन साखर उत्पादित केली आहे. बिहारमधे ४.२१, उत्तराखंड १.९४, पंजाब ३, हरयाणा २.८०, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधे २.२६ लाख टन साखर उत्पादित झाली आहे.
--
देशात २६० लाख टन साखर विक्रीचा अंदाज
देशामधे गेल्यावर्षी सुमारे २५५ लाख टन साखर विक्री झाली होती. या वर्षी २६० लाख टन साखरेची देशांतर्गत विक्री होईल, असा अंदाज इस्माने वर्तविला आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वी देशात आॅक्टोबर २०१९ रोजी १४४.३ लाख टन, तर राज्यात ५४.७ लाख टन साखर शिल्लक होती. त्यामुळे यंदा साखरेच्या उत्पादनात घट झाली तरी, मागणीच्या तुलनेत अधिकच साखर उपलब्ध राहील.