देशातील साखर हंगाम १४२ लाख टन शिलकी साखरेने होणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 10:54 AM2019-08-31T10:54:42+5:302019-08-31T11:00:24+5:30
गेल्यावर्षी महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरविल्याने ऊसक्षेत्रात ११.५४ लाख हेक्टरवरून ८.२३ लाख हेक्टरपर्यंत घट झाली आहे.
पुणे : गेल्यावर्षी पावसाने दिलेली ओढ आणि यंदा पुराचा फटका बसल्याने राज्यातील ऊस गाळप हंगाम अडचणीत आहे. देशात आगामी ऊस गाळप हंगाम सुरू होताना तब्बल १४२ लाख टन साखर शिल्लक राहील, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे, तर २०१९-२० हंगाम संपल्यानंतर १६२ लाख टन साखर शिलकी राहील, असा प्राथमिक अंदाज आहे.
गेल्यावर्षी महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरविल्याने ऊसक्षेत्रात ११.५४ लाख हेक्टरवरून ८.२३ लाख हेक्टरपर्यंत घट झाली आहे. लांबलेल्या पावसामुळे जून महिन्यात जिल्ह्यासह विविध ठिकाणी चारा छावण्या सुरू होत्या. त्यासाठीदेखील मोठ्या प्रमाणावर ऊस गेला. त्यामुळे यंदा ५७० लाख टन ऊस गाळपातून ६३ लाख टन साखर उत्पादित होईल, असे पूरस्थिती उद्भवण्यापूर्वी साखर आयुक्तालयाने सांगितले होते. कोल्हापूर आणि सांगली या ऊस पट्ट्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने गाळपासाठी आणखी कमी ऊस उपलब्ध होईल. त्यामुळे साखरेचे उत्पादनही ५० लाख टनांच्या आसपास राहील, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, की आगामी गाळप हंगामामधे देशात २८२ लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज होता. महाराष्ट्र आणि इतर राज्यातील पूरस्थितीमुळे साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. देशातील साखर उत्पादन अडीचशे लाख टनापर्यंत घट होईल. राज्यात कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील उसाचे ३० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नुकसानाचा अंदाज येण्यासाठी आणखी आठवडा लागू शकतो. आताच्या स्थितीवरून साखरेचे उत्पादन ५० लाख टनापर्यंत घसरेल, असे वाटते.
.........
..म्हणून साखरेचे भाव टिकून राहण्यास मिळेल मदत
1 - राज्यात पूरस्थितीपूर्वी ६३ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. कोल्हापूर आणि सांगलीला पुरामुळे ३० टक्के ऊसक्षेत्र बाधित असल्याचा प्राथिमक अंदाज आहे.
2- खात्रीशीर आकडा हाती येण्यास आणखी पाच ते सात दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे साखरेचे उत्पादन ५० लाख टनांपर्यंत घसरेल.
3 - सध्या राज्यात ६५ लाख टन साखर शिलकी आहे, तर राज्याचा वार्षिक खप ७० लाख टन आहे. त्यामुळे पुढील हंगामअखेरीस ४५ लाख टनांच्या आसपास साखर शिल्लक राहील.
...................
गेल्या २०१८-१९ च्या ऊस गाळप हंगामामधे देशात ३२० आणि राज्यात १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा अडीचशे लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे, तर १४२ लाख टन साखर शिलकी आहे. म्हणजेच पुढील हंगामात देशात ३९२ लाख टन साखर हाती असेल. देशांतर्गत वार्षिक खप २५५ लाख टन आहे. केंद्र सरकारने ६० लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली असून, ४० लाख टनांचा बफर स्टॉक केला आहे. त्यामुळे साखरेचे भाव टिकून राहण्यास मदत मिळेल.
..........