सीआरपीएफ तळावर आत्मघाती हल्ला; पाच जवान शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 06:39 AM2018-01-01T06:39:15+5:302018-01-01T11:32:46+5:30
पाकधार्जिण्या अतिरेकी कारवायांनी विदीर्ण झालेल्या काश्मीरच्या सरत्या वर्षाची सांगता रविवारी आणखी एका रक्तपाताने झाली. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले
श्रीनगर : पाकधार्जिण्या अतिरेकी कारवायांनी विदीर्ण झालेल्या काश्मीरच्या सरत्या वर्षाची सांगता रविवारी आणखी एका रक्तपाताने झाली. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले, तर आणखी तिघे जखमी झाले. नंतर सुरक्षा दलांनी कित्येक तास केलेल्या जबाबी कारवाईत हल्ला करणारे दोन अतिरेकी ठार झाले.
गेल्या वर्षी उरी येथे झालेल्या हल्ल्याची आठवण ताजी व्हावी, असा हा आत्मघाती हल्ला रविवारी पहाटे २च्या सुमारास झाला. ‘सीअरपीएफ’ आणि पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीपासून आसपासच्या झुडपांमध्ये लपून बसलेले शस्त्रसज्ज अतिरेकी या तळात घुसले. प्रवेशद्वारावर पहारा देणाºया सशस्त्र जवानाने त्यांना हटकले, परंतु रॉकेट लॉन्चर व मशिनगन घेऊन आलेल्या या अतिरेक्यांनी हातबॉम्ब फेकत आत प्रवेश मिळविला.
सूत्रांनुसार, तळावरील निवासी इमारतीमध्ये गाढ झोपेत असलेले जवान या गडबडीने जागे झाले व अनेक जण बाहेर आले. अंदाधुंद गोळीबार करत, आत शिरलेल्या अतिरेक्यांच्या गोळ््यांनी यापैकी एक जवान जागीच ठार झाला. जखमींपैकी आणखी ३ जवानांना इस्पितळात उपचार सुरू असताना वीरमरण आले, तर एक जवान इसिपतळात नेत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने दगावला.
तळाच्या आवारात घुसलेले अतिरेकी नंतर गोळीबार करत प्रशासकीय इमारतीच्या आश्रयास गेले. तोपर्यंत सीआरपीएफच्या स्वत:च्या जवानांखेरीज जम्मू-काश्मीर पोलीस आणि विशेष पथकाची कुमक आली. अतिरेकी लपलेल्या इमारतीस वेढा घातला गेला. सायंकाळपर्यंत दोन्ही बाजूंनी अधून-मधून गोळीबार सुरू होता. दोन अतिरेक्यांना खिंडीत गाठून ठार करण्यात यश आले. घुसलेला तिसरा अतिरेकी न सापडल्याने, संध्याकाळपर्यंत तळाच्या संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू होती.
हे मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे. देशविरोधी शक्तींना भारताची भीती राहिलेली नाही, हेच अशा पुन्हा-पुन्हा होणाºया हल्ल्यांवरून दिसते. मोदींना देशाच्या अंतर्गत आणि बाह्य शत्रूंविरुद्ध कणखर पावले उचलावीत. देशाच्या सुरक्षेसाठी काँग्रेसचा अशा उपायांना पाठिंबाच राहील.
-सुश्मिता देव, प्रवक्त्या, काँग्रेस
शहिदांचे सांडलेले रक्त कामी येत आहे. ताल्हा रशीद, मोहम्मदभाई, कमांडर नूर मोहम्मद तंतरे आणि काश्मीरचे अन्य शहिदांचे वारस अजूनही शिल्लक आहेत. भारताचा शेवटचा सैनिक काश्मीर सोडून निघून जाईपर्यंत, असे हल्ले सुरूच राहतील.
- जैश-ए-मोहम्मद (जबाबदारी स्वीकारतानाचे निवेदन)
सीमेपलीकडून सशस्त्र दहशतवादी पाठविणे पाकिस्तान थांबविणार नाही, तोपर्यंत काश्मीरच्या जनतेला व सुरक्षा दलांना अशा घटनांना सामोरे जाणे टळणार नाही.
- एस. पी. वैद, पोलीस
महासंचालक, जम्मू-काश्मीर