पाक न्यायालयात आत्मघाती स्फोट
By admin | Published: March 7, 2016 11:00 PM2016-03-07T23:00:01+5:302016-03-07T23:00:01+5:30
पाकिस्तानच्या हिंसाचारग्रस्त वायव्य भागात एका आत्मघाती हल्लेखोराने न्यायालयात स्वत:चा स्फोट घडवून आणला. यात १४ ठार, तर २६ जण जखमी झाले.
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या हिंसाचारग्रस्त वायव्य भागात एका आत्मघाती हल्लेखोराने न्यायालयात स्वत:चा स्फोट घडवून आणला. यात १४ ठार, तर २६ जण जखमी झाले.
पंजाब प्रांताचे पुरोगामी गव्हर्नर सलमान तासिर यांच्या मारेकऱ्यास फासावर चढविल्याचा सूड म्हणून हा हल्ला केल्याचे सांगून तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या चारसद्दा जिल्ह्यातील शाबकदार येथे हा हल्ला झाला. या हल्ल्यात दोन पोलिसांसह १४ ठार, तर २६ जण जखमी झाले, असे जिल्हा पोलीस अधिकारी सोहेल खालीद यांनी सांगितले. सुरक्षा आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. हल्ल्याच्या वेळी न्यायालयात लोकांची गर्दी होती. आत्मघाती हल्लेखोराला रोखण्यात आले होते; मात्र तो स्वत:चा स्फोट घडवून आणण्यात यशस्वी ठरला, असे पोलिसांनी सांगितले.
तेहरिक ए तालिबानमधून फुटलेल्या जमातुल अहरार गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तासिर यांचा मारेकरी मुमताज कादरी याला फासावर चढविण्यात आल्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला, असे या गटाने म्हटले आहे. कादरीने फाशीच्या शिक्षेला दिलेले आव्हान सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर गेल्या मंगळवारी रावळपिंडी येथील कारागृहात त्याला फाशी देण्यात आली होती.