अपमान झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:28 AM2018-04-07T01:28:35+5:302018-04-07T01:28:35+5:30
गावातील एका विवाहीत महिलेची छेड काढून मुलगा पळून गेल्याने गावातील लोकांनी त्याच्या ५५ वर्षांच्या बापाला झाडाला बांधून मारहाण व शिवीगाळ केली. त्यामुळे दुखावलेल्या बापाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार पश्चिम गोदावरी जिल्ह्यात घडला.
पश्चिम गोदावरी (आंध्र प्रदेश) - गावातील एका विवाहीत महिलेची छेड काढून मुलगा पळून गेल्याने गावातील लोकांनी त्याच्या ५५ वर्षांच्या बापाला झाडाला बांधून मारहाण व शिवीगाळ केली. त्यामुळे दुखावलेल्या बापाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार पश्चिम गोदावरी जिल्ह्यात घडला. त्या बापाला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्याचे प्राण वाचले.
संजीवा राव हे सायमपालेम गावात कुटुंबीयांसह राहतात. त्यांचा मुलगा नागेंद्र याने गावातील एका विवाहित महिलेची छेड काढली. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना गाव पंचायतीकडे तक्रार केली. पंचायतीने मुलाला बोलावून घेतले, पण तिथे जाण्याऐवजी तो गावाबाहेर पळून गेला. त्याचा शोध न लागल्याने पंचायतीने संजीवा राव यांना बोलावून घेतले.
त्यांनी मुलाला पंचायतीसमोर आणू, असे सांगितले, पण मुलगा कुठे गेला, हे त्यांनाही माहीत नव्हते. त्यामुळे गावातील लोकांनी राव यांना एका झाडाला बांधून टाकले. अनेकांनी त्यांना शिवीगाळ केली, तर काहींनी त्यांना मारहाणही केली. काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली.
मानसिक धक्का
मात्र, आपला हा अपमान त्यांना सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी कीटकनाशक प्राशन केले. ते लक्षात येताच काहींनी त्यांना जवळच्या जंगारेड्डी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वेळेत उपचार झाल्याने त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, ते मानसिक धक्क्यातून बाहेर आलेले नसून, त्यासाठी बराच काळ लागेल, असे डॉक्टर म्हणाले. मुलाच्या गुन्ह्याची शिक्षा आपणास भोगावी लागल्याने, ते अस्वस्थ आहेत. (वृत्तसंस्था)