आत्महत्येचा प्रयत्न यापुढे गुन्हा नाही!

By admin | Published: March 28, 2017 04:01 AM2017-03-28T04:01:31+5:302017-03-28T04:01:31+5:30

मानसोपचारांसंबंधीचा नवा कायदा सोमवारी संसदेने मंजूर केल्याने आत्महत्येचा प्रयत्न करणे

Suicide attempt is no longer a crime! | आत्महत्येचा प्रयत्न यापुढे गुन्हा नाही!

आत्महत्येचा प्रयत्न यापुढे गुन्हा नाही!

Next

नवी दिल्ली : मानसोपचारांसंबंधीचा नवा कायदा सोमवारी संसदेने मंजूर केल्याने आत्महत्येचा प्रयत्न करणे हा यापुढे फौजदारी गुन्हा मानला जाणार नाही. मनोरुग्ण लहान मुलांना उपचार म्हणून विजेचे शॉक देण्यासही पूर्ण मज्जाव असेल. हे विधेयक आॅगस्टमध्ये राज्यसभेने मंजूर केले होते.
आत्महत्येचा प्रयत्न करणे या गुन्ह्याची भारतीय दंड विधानापासून फारकत करणे ही या विधेयकातील महत्त्वाची तरतूद आहे. ही कृती व्यक्ती पराकोटीच्या मानसिक उद्वेगापोटी करत असल्याने तो फौजदारी गुन्हा न मानता मानसिक असंतुलन मानले जाईल व त्यानुसार त्याच्यावर उपचार करण्यात येतील.
वयाने लहान असलेल्या मनोरुग्णांना विजेचे शॉक अजिबात न देणे व प्रौढांनाही भूल देऊन व स्नायू शिथिल होणारे औषध देऊन मगच हा उपचार करण्याचे बंधन नव्या कायद्यात आहे. व्यक्तीचे मानसिक संतुलन ठीक नसले तरी त्याच्या मूलभूत मानवी
हक्कांची पायमल्ली होणार नाही व अप्रतिष्ठा होणार नाही, अशा पद्धतीने त्याच्यावर मानसोपचार करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. भविष्यात आपल्याला मानसिक आजार झाल्यास आपल्यावर असे उपचार करायचे व त्याची व्यवस्था कोणी करायची हे आधीपासून ठरविण्याचा हक्क प्रत्येक नागरिकास असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार व्हावेत
मनोरुग्ण व्यक्तीस इस्पितळांत न डांबता घरी आणि समाजात राहूनच त्याचे मानसिक आरोग्य ठाकठीक करण्यावरही कायद्यात भर आहे. एखादा रुग्ण स्वत:हून इस्पितळात दाखल व्हायला तयार झाला तरी त्याचे तेथील वास्तव्य कमी राहावे व त्याच्यावर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार व्हावेत, असे कायदा सांगतो. देशाच्या लोकसंख्येपैकी सहा ते सात टक्के लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराने ग्रस्त असतात व त्यापैकी एक ते दोन टक्के लोकांचा आजार टोकाला पोहोचलेला असतो, असा अंदाज आहे.

सध्या तरी मने ताळ्यावर!
या विधेयकातील तरतुदींचा उल्लेख करून आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा सदस्यांना उद्देशून विनोदाने म्हणाले, सध्या आपल्या सर्वांची मने ताळ्यावर असतील अशी आशा आहे. कोणाला स्थिती खालावतेय असे वाटत असेल तर त्याला आताच उपचारांसाठी मुक्रर करून ठेवता येईल!

Web Title: Suicide attempt is no longer a crime!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.