मुलाने केलेल्या कृत्याची लाज वाटते, आत्मघाती हल्लेखोर आदिल दारच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 01:11 PM2019-02-16T13:11:52+5:302019-02-16T13:15:16+5:30
सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आले होते. हा हल्ला घडवून आणणारा आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दार याच्या कुटुंबीयांना त्याने केलेल्या क्रूर कृत्यामुळे धक्का बसला आहे.
श्रीनगर - सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आले होते. हा हल्ला घडवून आणणारा आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दार याच्या कुटुंबीयांना त्याने केलेल्या क्रूर कृत्यामुळे धक्का बसला असून, मुलाने केलेल्या कृत्याची लाज वाटते, अशी प्रतिक्रिया आदिलच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
पुलवामा येथील आत्मघाती ह्ल्ला घडवून आणणार आदिल अहमद दार हा काश्मीरमधील एका गावातील रहिवासी होता.त्याने केलेल्या या कृत्याबाबत प्रतिक्रिया देताना त्याचा नातेवाईक अब्दुल रशिद म्हणला की, ''कुठल्याही व्यक्तीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यावर कुणाला आनंद होईल. आदिल याने लहानपणीच आपले शिक्षण सोडले होते. तो मोलमजुरी करत असे. गेल्यावर्ष मार्च महिन्यात तो भाऊ समीर दारसह मित्रांना भेटायला जातो असे सांगून, बेपत्ता झाला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या आई-वडलांनी पोलिसांत माहिती दिली होती. तसेच दहशतवादाचा मार्ग सोडून परत येण्याचे आवाहनही केले होते. मात्र तो माघारी फिरला नाही.''
आदिल हा एवढा कट्टर दहशतवादी बनेल असे वाटले नव्हते. 2016 मध्ये बुऱ्हाण वानीच्या मृत्यूनंतर दगडफेक करत असताना त्याच्या पायात पेलेट गनची गोळी लागली होती. त्यानंतर तो कट्टक दहशतवादाकडे वळला, असेही आदिलच्या या नातेवाईकाने सांगितले.
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.