आत्महत्या करणारा शेतकरी भित्राच - हरियाणाच्या कृषीमंत्र्यांची मुक्ताफळे
By admin | Published: April 29, 2015 11:28 AM2015-04-29T11:28:01+5:302015-04-29T11:31:24+5:30
देशभरात शेतक-यांच्या आत्महत्येचे सत्र सुरु असतानाच हरियाणाच्या कृषीमंत्र्यांनी शेतक-यांनाच भित्रा ठरवत त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे उद्योग केले आहेत.
ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. २९ - अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने हताश झालेल्या शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु असतानाच हरियाणातील भाजपा सरकारमधील कृषी मंत्र्यांनी शेतक-यांना भित्रा ठरवत शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे उद्योग केले आहे. आत्महत्या करणारे शेतकरी भित्रे असून सरकार अशा शेतक-यांसोबत नाही असे संतापजनक विधान कृषीमंत्री ओमप्रकाश धनकड यांनी केले आहे.
शेतक-यांच्या आत्महत्येच्या घटनेने देशभरातून चिंता व्यक्त होत असतानाच या गंभीर विषयावर हरियाणाचे कृषीमंत्री ओमप्रकाश धनकड यांनी ज्ञान पाजळले. धनकड म्हणाले, आत्महत्या करणे हा कायद्यानुसार गुन्हा असून असा गुन्हा करणा-या शेतक-यांना सरकार पाठिंबा देणार नाही. कोणत्याही परिस्थीतीत आत्महत्येला प्रोत्साहन द्यायला नको असेही त्यांनी स्पष्ट केले. धनकड यांच्या विधानावर आता सर्वच स्तरातून तिखट प्रतिक्रिया येत आहे. शेतकरी पिकाचे नुकसान व कर्जाचा डोंगर यामुळे त्रस्त झाला आहे व धनकड त्यांना भित्रा ठरवत आहेत हा प्रकार निंदनीय आहे असे काँग्रेसचे स्थानिक नेते अशोक तंवर यांनी सांगितले. तर धनकड यांनी शेतक-यांचा अपमान केला असे अजय माकन यांनी म्हटले आहे.