UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने संपवलं आयुष्य; 'अॅलेक्स'ने वाचवण्याचा प्रयत्न केला, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 01:30 PM2023-05-09T13:30:58+5:302023-05-09T13:35:23+5:30
मालकाच्या मृत्यूनंतर पाळीव कुत्रा अॅलेक्सचाही मृत्यू झाला. जाणून घ्या कारण.
UP News: केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) तयारी करणाऱ्या तरुणाने उत्तर प्रदेशातील झाशीत आत्महत्या केली. 23 वर्षांच्या मुलासोबत घरात फक्त एक पाळीव कुत्रा होता. मुलाने फाशी घेतल्यानंतर त्या मुक्या जनावराने आपल्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तो अखेर अयशस्वी ठरला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र कुत्र्याने कोणालाही आत जाऊ दिले नाही.
एका पोलीस उपनिरीक्षकाने घरात घुसण्याचा प्रयत्न केला असता कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करुन जखमी केले. मात्र, नंतर कुत्र्याला ताब्यात घेण्यात पालिकेच्या पथकाला यश आले. झाशीच्या कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील पंचवटी कॉलनीत हा प्रकार घडला. येथील नालंदा ओम गार्डनमध्ये राहणाऱ्या आनंद अग्निहोत्री यांचा एकुलता एक मुलगा संभव अग्निहोत्री याने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. संभव अग्निहोत्री नागरी सेवांची तयारी करत होता. नातेवाईकांनी सांगितले की, मृत संभवचे वडील आनंद अग्निहोत्री हे रेल्वे डीआरएम कार्यालय झाशी येथे अधिकारी आहेत.
कुटुंबीय भोपाळला गेले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद अग्निहोत्री यांची पत्नी काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त आहे. त्यासाठी ते भोपाळ (मध्य प्रदेश) येथे उपचारासाठी गेले होते. घरात त्यांचा मुलगा संभव आणि पाळीव कुत्रा अॅलेक्स होते. काल संध्याकाळी वडिलांनी संभवच्या मोबाईलवर अनेकदा फोन केला, पण तो फोन उचलत नव्हता. त्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना फोन करुन सांगितले. शेजारी जेव्हा त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा पाळीव कुत्रा घराच्या पोर्चमध्ये बसला होता, तो कोणालाही आत येऊ देत नव्हता.
अॅलेक्सनही जीव सोडला...
कुत्रा सर्वांना ओळखत होता, पण त्यावेली तो खूप विचित्र वर्तन करत होता. कुत्र्याच्या बदललेल्या वागणुकीमुळे अनुचित प्रकार घडल्याची भीती शेजाऱ्यांना वाटली आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. अलेक्सने सुमारे 4 तास कोणालाही घरात प्रवेश करू दिला नाही. पोलिसांनी पालिकेच्या पथकाला पाचारण केले. खूप प्रयत्नांनंतर अॅलेक्सला पकडले आणि नंतर बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. यानंतर अॅलेक्सचाही मृत्यू झाला. मृत्यूचे कारण ऍनेस्थेसियाचा ओव्हरडोस असल्याचे मानले जात आहे. कुत्र्याला आटोक्यात आणल्यानंतर पोलीस घरात घुसले तेव्हा तेथील दृश्य पाहून ते थक्क झाले.