पाहुण्या चित्त्यांना बोचणार नाहीत काटे; महाराष्ट्राच्या ग्रासमॅनची कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 05:57 AM2022-09-17T05:57:04+5:302022-09-17T05:57:54+5:30
२०१२ साली राजस्थान व मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या श्योपूर व मुुरैना जिल्ह्यातील ३४४ वर्ग किलोमीटर परिसरातील कुनो व्याघ्र प्रकल्पात सिंह सोडण्याचा प्रस्ताव होता.
नरेंद्र जावरे
मेळघाट (जि. अमरावती) : मेळघाटातील ‘ग्रासमॅन’ प्रा. गजानन मुरतकर यांनी मध्य प्रदेशातील कुनो पालपूर जंगलातील उजाड प्रदेशात २०१३ ते २०१९ अशी सलग सात वर्षे परिश्रम घेऊन व्याघ्र प्रकल्प कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नामिबियामधून आलेल्या चित्त्यांसाठी योग्य कुरणक्षेत्र तयार केले आहे. याच मऊ गवतावर आता चित्त्यांची पावले पडणार आहेत.
२०१२ साली राजस्थान व मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या श्योपूर व मुुरैना जिल्ह्यातील ३४४ वर्ग किलोमीटर परिसरातील कुनो व्याघ्र प्रकल्पात सिंह सोडण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी आवश्यक कुरणक्षेत्र तयार करण्याचे काम सुरू झाले होते. तेव्हा शुष्क पानझडीचे हे जंगल होते. परंतु, सिंह सोडण्याची योजना रद्द झाली. मात्र, कुरणक्षेत्र तयार झाल्यानंतर चित्त्यांसाठी योग्य वातावरणनिर्मिती तपासण्यात आली. देशातील १४पेक्षा अधिक राज्यांमध्ये गवती कुरण तयार करण्याचा अनुभव असलेले मेळघाटातील ग्रासमॅन प्रा. गजानन मुरतकर यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
तिन्ही ऋतूंमध्ये कुनो पालपूरचे वातावरण चित्त्यांसाठी उत्कृष्ट आहे. डेहराडून व इतर सर्व संस्थांनीसुद्धा तसा अहवाल दिला. कुरणक्षेत्र सर्वाधिक प्रमाणात विकसित झाले आहे. तृणभक्षी प्राण्यांची मुबलक संख्या व नदी असल्याने पाहुणा चांगला स्थिरावणार, यात दुमत नाही. - प्रा. गजानन मुरतकर, ग्रासमॅन, मेळघाट
दक्षिण आफ्रिकेच्या जंगलाशी कुनो पालपूर अभयारण्याचा परिसर मिळताजुळता असल्याचे आढळून आले आहे. गवा वगळता सर्व तृणभक्षी प्राणी असलेले कुनो हे देशातील पहिले अभयारण्य आहे. बोरीची काटेरी झाडे विपुल होती. कुरणक्षेत्र तयार करण्यात ते मोठे आव्हान होते. बोरीचे काटे चित्त्याच्या पायात रुतून जखमा होऊ नयेत म्हणून बोरीची झाडे पूर्णतः काढली गेली.