बोअरवेलमध्ये पडलेल्या सुजीतला वाचवण्याचे प्रयत्न अपयशी; तीन दिवसांनंतर मृतदेह हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 07:16 AM2019-10-29T07:16:08+5:302019-10-29T07:52:28+5:30

तीन दिवसांपूर्वी बोअरवेलमध्ये पडलेल्या सुजीतचा मृत्यू

Sujith Wilson Trapped In Tamil Nadu Borewell For 3 Days Dies | बोअरवेलमध्ये पडलेल्या सुजीतला वाचवण्याचे प्रयत्न अपयशी; तीन दिवसांनंतर मृतदेह हाती

बोअरवेलमध्ये पडलेल्या सुजीतला वाचवण्याचे प्रयत्न अपयशी; तीन दिवसांनंतर मृतदेह हाती

Next

चेन्नई: जवळपास तीन दिवसांपासून बोरवेलमध्ये अडकलेल्या दोन वर्षांच्या सुजीत विल्सनचा मृत्यू झाला आहे. सुजीतला वाचवण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून अथक प्रयत्न सुरू होते. बोरवेलमध्ये अडकलेल्या सुजीतचा मृतदेह पहाटेच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. सुजीतच्या सुखरुप सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रार्थना केल्या होत्या. मात्र सुजीतला सुखरुप बाहेर काढण्यात अपयश आलं. 




तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या एका गावात असलेल्या बोरवेलमध्ये सुजीत विल्सन गेल्या तीन दिवसांपासून अडकला होता. त्याला वाचवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. मात्र हे प्रयत्न अपुरे ठरले. पहाटेच्या सुमारास सुजीतचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. वाहतूक विभागाचे प्रधान सचिव जे. राधाकृष्णन यांनी याबद्दलची माहिती दिली. 'सुजीतचा मृतदेह हाती लागला आहे. त्याला जिवंत बाहेर काढण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. मृतदेह बाहेर काढला तेव्हा तो चांगल्या स्थितीत नव्हता. त्यातून दुर्गंध येत होता,' अशी माहिती राधाकृष्णन यांनी दिली. 




गेल्या तीन दिवसांपासून सुजीतच्या सुखरुप सुटकेसाठी प्रयत्न सुरू होते. पंतप्रधान मोदींनी याबद्दल ट्विटदेखील केलं होतं. 'मुख्यमंत्री ई. पलानिसामी यांच्याकडून मुलाच्या बचावासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतली आहे. मी सुजीत विल्यनसाठी प्रार्थना करतो. तो सुरक्षित राहावा, यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत,' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 




दोन वर्षांचा सुजीत विल्सन 25 ऑक्टोबरला बोरवेलमध्ये पडला. त्यानंतर त्याच्या बचावासाठी प्रशासनानं प्रयत्न सुरू केले. बोरवेलमध्ये पडलेला सुजीत काही वेळानं बेशुद्ध झाला. त्याला वाचवण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि स्थानिक प्रशासन कामाला लागलं होतं. सुजीत आधी 26 फूट खोल खड्ड्यात पडला होता. मात्र तिथून तो आणखी खाली घसरला आणि 70 फूट खोलवर जाऊन अडकला. 

Web Title: Sujith Wilson Trapped In Tamil Nadu Borewell For 3 Days Dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.