शेतकऱ्यांना देशद्रोही आणि खलिस्तानी म्हणायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?; सुखबीरसिंग बादल यांचा भाजपला सवाल
By मोरेश्वर येरम | Published: December 3, 2020 06:18 PM2020-12-03T18:18:57+5:302020-12-03T18:20:15+5:30
शेतकरी आंदोलनात अनेक वृद्ध महिला देखील सामील झालेल्या आहेत. मग त्यापण खलिस्तानी आहेत का? देशाच्या शेतकऱ्यांना संबोधित करण्याचा हा नेमका कोणता प्रकार आहे?
चंदीगड
नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये बैठकांचं सत्र सुरू असूनही अद्याप काही तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला माजी खेळाडूंनीही पाठिंबा दिला आहे. शिरोमणी अकाली दलाचे खासदार सुखबीरसिंग बादल यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे. आंदोलनातील शेतकऱ्यांना देशद्रोही ठरविण्याचा अधिकार भाजपला कुणी दिला, असा सवाल सुखबीरसिंग बादल यांनी उपस्थित केला आहे.
"शेतकरी आंदोलनात अनेक वृद्ध महिला देखील सामील झालेल्या आहेत. मग त्यापण खलिस्तानी आहेत का? देशाच्या शेतकऱ्यांना संबोधित करण्याचा हा नेमका कोणता प्रकार आहे? शेतकऱ्यांना देशद्रोही आणि खलिस्तानी म्हणणं हा त्यांचा अपमान आहे. देशातील शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याचा अधिकार कुणी दिला?", असं सुखबीरसिंग बादल म्हणाले.
प्रकाशसिंह बादल यांनी पद्म विभूषण पुरस्कार केला परत
शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा न निघाल्याने प्रकाशसिंह बादल यांना मोदी सरकारने दिलेला पद्म विभूषण पुरस्कार परत करण्याबाबतचं पत्र राष्ट्रपतींना लिहीलं आहे. "प्रकाशसिंह बादल यांनी आपलं पूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व्यतित केलं आहे. त्यामुळे सरकारला एक खणखणीत चपकार देण्यासाठी त्यांनी आपला पुरस्कार परत केला आहे. जर शेतकऱ्यांनाच हा नवा कायदा गरजेचा वाटत नसताना सरकार तो लादण्याचा का प्रयत्न करतंय?", असं सुखबीरसिंह बादल म्हणाले.
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शेतकरी आंदोलनात खलिस्तान्यांचा समावेश असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या आंदोलनात हिंसक वळण देण्यासाठी काही खलिस्तानी देखील यात सामील झाले आहेत, असा दावा खट्टर यांनी केला होता.