छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला; १७ जवान शहीद, १४ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 04:19 PM2020-03-22T16:19:17+5:302020-03-22T16:20:22+5:30
जिल्हा राखीव दलावरील सर्वात मोठा हल्ला; जखमी जवानांना उपचारांसाठी रायपूरला हलवलं
सुकमा: छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केलाय. यामध्ये १७ जवान शहीद झाले असून १४ जखमी झाले आहेत. डीआरजीच्या जवानांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. शनिवारी झालेल्या या हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांचे मृतदेह हाती लागले आहेत.
नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना उपचारांसाठी हेलिकॉप्टरच्या मदतीनं रायपूरला नेण्यात आलंय. बस्तरमध्ये याआधी अनेकदा नक्षलवाद्यांनी जवानांना लक्ष्य केलं होतं. मात्र डीआरजीला (जिल्हा राखीव दल) कधीही इतक्या मोठ्या जीवितहानीला सामोरं जावं लागलं नव्हतं. हल्ल्यात शहीद झालेल्या १७ जवानांपैकी १२ जवान डीआरजीचे आहेत. स्थानिक तरुणांचा भरणा असलेल्या डीआरजीनं नक्षलवाद्यांच्या विरोधात सर्वात प्रभावी कारवाया केल्या आहेत.
पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी दीडच्या सुमारास चकमकीला सुरुवात झाली. कोराजगुडाच्या चिंतागुफामध्ये सशस्त्र दल आणि पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात सशस्त्र कारवाई सुरू केली. डीआरजी, विशेष कृती दल आणि कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिज्योलुशन ऍक्शन) यांनी संयुक्तपणे नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली. एल्मागुंडा परिसरात नक्षलवादी लपल्याची माहिती संयुक्त टीमला मिळाली होती. यानंतर चिंतागुफा, बुर्कापाल आणि टिमेलवाडा भागात मोठी कारवाई सुरू झाली.
संयुक्त टीम एल्मागुंडाजवळ पोहोचताच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्याला संयुक्त टीमनंदेखील चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये पाच नक्षलवादी मारले गेले. तर तितकेच जखमीदेखील झाले. या कारवाईदरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांकडील शस्त्रसाठा पळवला. यामध्ये एके-४७, इंसास, एलएमजीचा समावेश आहे. कालपासून काही जवान बेपत्ता झाले. त्यांच्या शोधासाठी १५० सुरक्षा अधिकारी रवाना झाले होते. अखेर आज १७ जवानांचे मृतदेह हाती लागले.