100 रुपयांच्या पैजेसाठी त्याने मारली पूर आलेल्या नदीत उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 11:12 AM2018-08-02T11:12:38+5:302018-08-02T11:13:23+5:30
पैज जिंकण्यासाठी वाट्टेल ते करणारी माणसे आपण पाहिली असतील. अशीच एक घटना...
बल्लभगड (हरयाणा) - पैज जिंकण्यासाठी वाट्टेल ते करणारी माणसे आपण पाहिली असतील. अशीच एक घटना हरयाणातील बल्लभगड परिसरात घडली आहे. येथे केवळ 100 रुपयांच्या पैजेसाठी एका तरुणाने पुरामुळे दुथडी भरून वाहत असलेल्या यमुना नदीमध्ये उडी घेतली. हा तरुण पोहण्यात पटाईत होता. मात्र पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तो पाण्यासोबत वाहून गेला. या तरुणाचे नाव राहुल असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सध्या एनडीआरएफच्या पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे.
बल्लभगड जिल्ह्यातील मोहना गावातील या तरुणाने मंगळवारी संध्याकाळी यमुना नदीत उडी मारली होती. त्यात तो वाहून गेला होता. याआधी या तरुणाने मंगळवारी सकाळी नदीत उडी मारून ती पार केली होती. दरम्यान, संध्याकाळी पुराचे पाणी वाढल्याने ते पाहण्यासाठी गावकरी जमले होते. त्याचवेळी गावातील एका माणसाने जो नदी पार करेल त्याला 100 रुपये देण्यात येतील अशी पैज लावली. त्यावेळी राहुल आणि त्याचा मित्र कृष्णा दोघेही तिथे उपस्थित होते. या दोघांनीही पैज जिंकण्यासाठी पुरामुळे दुथडी भरून वाहत असलेल्या नदीत उडी घेतली. यावेळी काही गावकरी या प्रकाराचे मोबाइलवर व्हिडीओ शूटिंग करत होते. दरम्यान, कृष्णा कसाबसा नदीतून बाहेर आला. मात्र राहुल पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहून गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल हा यमुना नदीवर असलेल्या पुलाजवळ ढाबा चालवतो. त्याचा शोध घेण्यासाठी पाणबुडे आणि एनडीआरएफचे पथक शोधमोहीम राबत आहेत. मात्र अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.