खासदारांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे... संसदेतील वर्तनावर सुमित्रा महाजनांचे भावनिक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 02:26 PM2018-07-10T14:26:43+5:302018-07-10T14:34:04+5:30
संसद हे लोकशाहीचे मंदिर असून त्याची प्रतिष्ठा कायम ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली- गेल्या काही अधिवेशनांमध्ये संसदेचा भरपूर वेळ गोंधळामुळे वाया गेल्यानंतर लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्व खासदारांना एक भावनिक शब्दांमध्ये पत्र लिहिले आहे. पुढील आठवड्यात संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील बहुतांश वेळ घोषणाबाजी आणि गदारोळात गेल्यामुळे व्यथित झालेल्या महाजन यांनी खासदारांना पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या आहेत.
At times, some Hon'ble Members have come to the well of the House and
— ANI (@ANI) July 10, 2018
shouted slogans, shown placards and banners and interrupted the proceedings of the House. Consequently, House had to be adjourned repeatedly without transacting any business: Lok Sabha speaker Sumitra Mahajan
संसद चालू देणे हे खासदारांची नैतिक जबाबदारी आहे याची आठवण महाजन यांनी या पत्रामधून करुन दिली आहे. सर्व खासदारांनी आता आत्मपरिक्षण करण्याची वेळ असून संसद आणि लोकशाहीची भविष्यातील काय प्रतिमा असेल हे ठरवण्याचीही ही वेळ आहे असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे. संसद हे लोकशाहीचे मंदिर असून त्याची प्रतिष्ठा कायम ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सभागृहात अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत येणं, घोषणा देणं, फलक दाखवणं असेही प्रकार केले जातात. त्याबाबत महाजन यांनी या पत्रात चिंता व्यक्त केली असून आगामी अधिवेशनात सर्व लोकप्रतिनिधी आपल्याला सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
I am sure the House will continue to receive utmost cooperation from all of
— ANI (@ANI) July 10, 2018
you in future also and we will establish high standards of Parliamentary conduct, discipline and decorum: Lok Sabha Sumitra Mahajan
'' लोक आणि माध्यमं लोकप्रतिनिधींचे संसदेतील आणि संसदेबाहेरील वर्तन, काम अत्यंत काळजीपूर्वक पाहात असतात असा माझा अनुभव आहे.''असे आठवेळा खासदार म्हणून निवडून येणाऱ्या सुमित्राताई महाजन यांनी या पत्रात म्हटले आहे. या अत्यंत प्रतिष्ठित सभागृहाचे (ऑगस्ट हाऊस) सदस्य होणं हा एक विशेषाधिकारच आहे, लोकांच्या आपल्या खासदाराकडून मोठ्या अपेक्षा असतात, त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला असतो. त्याबदल्यात तुम्हीही तुमच्या मतदारसंघातील लोकांच्या व राष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण करुन लोकशाही व देश बळकट होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असं महाजन यांनी लिहिलं आहे. 18 जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार असून ते 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे.