तेलंगणात सूर्य कोपला; उष्माघाताचे २१९ बळी
By admin | Published: May 4, 2016 02:07 AM2016-05-04T02:07:11+5:302016-05-04T02:07:11+5:30
संपूर्ण तेलंगणाला कडक उन्हाळ्याचा मोठा फटका बसला असून, राज्यात उष्माघातामुळे २१९ जण मरण पावले आहेत. नालगोंडा जिल्ह्यात मृतांची संख्या ७६ असून, नालगोंडामध्ये ३५ जणांचा
हैदराबाद : संपूर्ण तेलंगणाला कडक उन्हाळ्याचा मोठा फटका बसला असून, राज्यात उष्माघातामुळे २१९ जण मरण पावले आहेत. नालगोंडा जिल्ह्यात मृतांची संख्या ७६ असून, नालगोंडामध्ये ३५ जणांचा उष्माघाताने बळी घेतला आहे.
सरकारच्या आपत्ती निवारण विभागानेच ही माहिती दिली असून, आदिलाबाद, निजामाबाद, खम्माम आणि करीमनगर या जिल्ह्यांत आणखी काही काळ उन्हाच्या तीव्र झळा चालूच राहतील, असे हवामान खात्याने नमूद केले आहे. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात, तसेच कर्नाटकातील टुमकूर आणि हसन जिल्ह्यांतही पारा ४४ च्या आसपास राहील, असे वेधशाळेने म्हटले आहे. आंध्र प्रदेशात उष्माघाताने सुमारे ५९ जणांचा बळी घेतला आहे. राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्येही तापमान ४४ च्या वर गेले असून, काही ठिकाणी ते ४६ च्या आसपास आहे. जेसलमेरमध्ये तर तापमान ५0 अंशांच्या आसपास पोहोचले असल्याने, सकाळी ९ वाजल्यानंतर लोक शक्यतो बाहेर पडण्याचेही टाळत आहेत. ओडिशातील बहुसंख्य शहरे व जिल्ह्यांतही तापमान ४४ च्या आसपास आहे. आतापर्यंत ओडिशामध्ये उष्माघाताने १३५ जण मरण पावले. कडक उन्हाळ्यामुळे बिहारमध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या काळात यज्ञ, होमहवन करण्यावरच बंदी घालण्यात आली आहे.