सूर्य कोपला, पारा ४३ अंशांवर; आठ राज्यांमध्ये उष्णतेची लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 05:58 AM2024-04-09T05:58:16+5:302024-04-09T05:58:42+5:30
आठ राज्यांमध्ये उष्णतेची लाट, अनेक ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशभरात लोकसभा निवडणुकीचा फिव्हर चढला असताना तापमानाचा पाराही हळूहळू वर सरकत आहे. काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्याचबरोबर जवळपास ८ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
देशातील १४ राज्यांमध्ये काही ठिकाणी रविवारी आणि सोमवारीही पावसाने हजेरी लावली. उष्णतेची लाट येणाऱ्या राज्यांत कर्नाटक, केरळ, गुजरात, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी यांचा समावेश होतो. या राज्यांमध्ये सध्या तापमान ४३ अंशांवर पोहोचले आहे. रविवारी आंध्र प्रदेशातील नंदयाल येथे सर्वाधिक ४४.५ अंश तापमानाची नोंद झाली. केरळ, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये ९ ते १२ एप्रिलदरम्यान पाऊस पडू शकतो.
मध्य प्रदेश, झारखंडमध्ये पाऊस अन् वारा
मध्य प्रदेशात गारपीट, पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने हजेरी लावली. रविवारी संध्याकाळी भोपाळला पावसाने तडाखा दिला. सिवनी, मालाजखंड, गुना, अशोकनगर, सिहोर, शाजापूर, बैतूल, नर्मदापुरम, सागर, राजगड, बालाघाट, दिंडोरी, विदिशा, रायसेन, धार, देवास, इंदूर, पंढूर आणि मांडला येथे रिमझिम पाऊस झाला. झारखंडमध्ये रविवारी रात्री उशिरा रांचीच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला.
छत्तीसगडमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी
येत्या आठवड्यात दोन पश्चिमी हवामान बदल अपेक्षित आहेत. पहिला हवामान बदल १० एप्रिल आणि दुसरा १३ एप्रिलला सक्रिय होईल. त्यामुळे उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशात १० ते १३ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे, १३ एप्रिल रोजी पंजाब आणि चंडीगडमध्ये पाऊस पडू शकतो.
छत्तीसगडमध्ये ९ ते ११ एप्रिलपर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रायपूर, बिलासपूर, दुर्ग, बस्तर आणि सुरगुजा विभागात पुढील तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी पहाटे रायपूर आणि गरिआबंदसह काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह सरी कोसळल्या.
बिहारमध्येही तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, मंगळवारी पाटणासह १४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहतील.