सुनंदा मृत्यूप्रकरणी आता अत्याधुनिक चाचण्या?
By admin | Published: October 11, 2014 12:26 AM2014-10-11T00:26:13+5:302014-10-11T00:26:13+5:30
पोलिसांनी पुरावे गोळा करण्यात ढिलाई दाखविल्याचा आरोप फेटाळतानाच दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी तपास सीबीआयकडे सोपविण्याची शक्यता फेटाळून लावली
नवी दिल्ली : खा. शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूबाबत एम्सच्या डॉक्टरांनी नवा अहवाल पोलिसांना सादर केला असून तो कोणत्याही निष्कर्षाप्रत जाण्याबाबत अपूर्ण असल्यामुळे पोलीस आता नव्या अत्याधुनिक न्यायवैद्यक चाचण्यांचा अवलंब करू शकतात.
पोलिसांनी पुरावे गोळा करण्यात ढिलाई दाखविल्याचा आरोप फेटाळतानाच दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी तपास सीबीआयकडे सोपविण्याची शक्यता फेटाळून लावली. या प्रकरणाचा तपास करण्यास पोलीस सक्षम आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. न्यायवैद्यक अहवाल अपूर्ण असून आमच्या तपासाची स्थिती प्रलंबित आहे. अद्यापही आम्हाला पूर्ण न्यायवैद्यक अहवाल मिळाला नसल्याने आम्ही कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचलेलो नाही. आम्ही निष्कर्ष काढल्यानंतरच तुम्हाला माहिती देऊ, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.
एम्सच्या डॉक्टरांच्या पॅनेलने वैद्यकीय मंडळाचे १२ पानी मत ३० सप्टेंबर रोजी पोलिसांना सादर केले असून सुनंदा यांचा मेंदू, किडनी, फुफ्फुसे आणि यकृत सामान्यपणे काम करीत होते. त्यांचा मृत्यू विषामुळेच झाला असे वैद्यकीय मंडळाने नमूद केले.
पहिल्या अहवालातही हाच निष्कर्ष होता. केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेने (सीएफएसएल) सुनंदाच्या व्हिसेराचा अभ्यास केला असून त्या आधारावर तीन डॉक्टरांच्या पॅनेलने नवा अहवाल दिला आहे. १७ जानेवारी रोजी दक्षिण दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुनंदा यांचा मृतदेह आढळून आला. पती शशी थरूर आणि पाकिस्तानी महिला पत्रकार मेहर तरार यांच्या कथित प्रेमप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी टिष्ट्वटर युद्ध छेडले होते. त्यामुळे मृत्यू संशयास्पद मानला जात होता.
सर्वंकष चौकशी व्हावी- माकप
सुनंदा यांच्या मृत्यूमागील कारणांबाबतची अनिश्चितता कायम असून काय घडले ते बाहेर यायला हवे, असे माकपचे राज्य सचिव पिनारायी विजयन यांनी म्हटले. या प्रकरणी सखोल तपासाची गरज असून सुनंदा यांच्या मृत्यूचे सत्य जाणून घेण्याचा देशातील जनतेला अधिकार आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री खा.शशी थरुर यांनी पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल एम्सच्या डॉक्टरांनी नवा अहवाल दिल्याबद्दल भाष्य टाळले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)