सुनंदा पुष्कर आत्महत्या प्रकरण: शशी थरुर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 05:36 PM2018-05-14T17:36:36+5:302018-05-14T17:36:36+5:30
दिल्लीच्या लीला पॅलेस या हॉटेलमध्ये जानेवारी 2014 मध्ये सुनंदा पुष्कर मृतावस्थेत आढळून आल्या होत्या.
नवी दिल्ली: काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर आत्महत्याप्रकरणी सोमवारी दिल्ली पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले. तीन हजार पानांच्या या आरोपपत्रात शशी थरुर यांच्यावर कलम 306 अंतर्गत आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या घटनाक्रमानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शशी थरुर यांना बदनाम करण्यासाठीचा हा डाव आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत आहे. मोदी सरकारच्या सांगण्यावरूनच हे सर्व सुरू आहे. भाजपाचा बदला घेण्याचा कारखाना पुन्हा एकदा सुरू झाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.
दिल्लीच्या लीला पॅलेस या हॉटेलमध्ये जानेवारी 2014 मध्ये सुनंदा पुष्कर मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. सुरुवातीला सुनंदा पुष्कर यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. औषधांच्या अतिसेवनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याचा वैद्यकीय अहवाल दिल्ली पोलिसांनी उघड केल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली होती. सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हे, तर विषप्रयोगानेच झाला आहे, असे शवविच्छेदन अहवालात म्हटले होते. सुनंदा पुष्कर यांच्या शरीरावर दाताने चावल्याच्या खुणा, सिरींजच्या खुणा आणि झटापट झाल्याने जखमा झाल्याच्या खुणा आढळल्या होत्या. या खुणांमुळे त्यांची हत्याच झाली असावी असे स्पष्ट होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे शशी थरुर यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या.
जानेवारी 2015मध्ये पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयचीदेखील मदत घेतली होती. पुष्कर यांचा मृत्यू पोलोनियम किंवा अन्य किरणोत्सर्गी घटकांमुळे झाला नाही असा अहवाल एफबीआयने दिला होता. पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानी लेखक आणि पत्रकार मेहेर तरार यांचीदेखील कसून चौकशी केली होती.