सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू घातक रसायनांमुळे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2016 01:17 AM2016-01-16T01:17:10+5:302016-01-16T01:17:10+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर (५३) यांचा मृत्यू घातक रसायनांमुळे झाला असल्याची शक्यता अमेरिकेच्या एफबीआय या तपास संस्थेने वर्तवली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर (५३) यांचा मृत्यू घातक रसायनांमुळे झाला असल्याची शक्यता अमेरिकेच्या एफबीआय या तपास संस्थेने वर्तवली आहे. दिल्लीच्या आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) विषबाधा हे मृत्यूचे कारण नमूद केले होते, त्यालाही या अहवालामुळे दुजोरा मिळाला आहे, तथापि विषारी घटक नेमके कोणते याबाबत स्पष्टता नाही.
एफबीआयच्या अहवालाबाबत एम्सने केलेल्या विश्लेषणाचा निष्कर्ष दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी शुक्रवारी पत्रकारांसमक्ष उघड केला. सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, हे स्पष्ट करतानाच त्यांनी त्यांच्या व्हिसेरामध्ये किरणोत्सारी पदार्थाचे अस्तित्व आढळून आले नसल्याचे नमूद केले. एम्सने विषबाधेचा अहवाल दिला होता. एफबीआयनेही त्याला दुजोरा दिला असल्याचे एम्सच्या न्यायवैज्ञक विभागाचे प्रमुख सुधीर गुप्ता यांनी सांगितले.
मृत्यू नैसर्गिक नव्हता, हे आतापर्यंतच्या तपासातून गोळा केलेल्या पुराव्यांतून स्पष्ट झाले आहे, हे मी खात्रीलायकरीत्या सांगू शकतो, असे बस्सी यांनी म्हटले. एफबीआयने किरणोत्सारी पदार्थांचे अस्तित्व पूर्णपणे नाकारले नाही, मात्र व्हिसेराच्या नमुन्यांची खालावलेली स्थिती पाहता अशा पदार्थांची तीव्रता मोजता आलेली नाही, अशी पुस्ती गुप्ता यांनी जोडली. अतिकिरणोत्सारी पोलोनियम -२१० किंवा पीओ-२१० हे पदार्थ अतिशय दुर्मीळ असून त्यांना हुडकून काढणेही अशक्य असल्याचे एफबीआयच्या अहवालाचा हवाला देत त्यांनी सांगितले. सुनंदा यांचा व्हिसेरा अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी येथील एफबीआयच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्यांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे या संस्थेने स्पष्ट केले; मात्र तो विषारी घटक नेमका कोणता होता, हे नमूद केले नाही.
शशी थरुर यांना पाचारण करणार
सुनंदा यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे पाहता दिल्ली पोलिसांनी खासदार शशी थरुर यांना चौकशीसाठी पाचारण करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ पोलीस अधिकारी वैज्ञानिक पद्धतीने या प्रकरणाचा तपास करीत असून आवश्यकता भासेल तेव्हा त्यांना चौकशीसाठी समन्स पाठविले जातील, असे बस्सी यांनीस्पष्ट केले.