सुनीता केजरीवाल बनणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री? व्हिडीओमधून मिळाले स्पष्ट संकेत, तर्कवितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 04:48 PM2024-03-23T16:48:35+5:302024-03-23T16:49:06+5:30
Sunita Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई होऊन त्यांची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या दिल्लीचं मुख्यमंत्रिपद सांभाळण्याची शक्यता आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केल्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांना आता २८ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई होऊन त्यांची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या दिल्लीचं मुख्यमंत्रिपद सांभाळण्याची शक्यता आहे. सुनीता केजरीवाल यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडीओमधून तसे संकेत मिळत आहेत.
सुनीता केजरीवाल यांनी शनिवारी तुरुंगात असलेले पती अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीमधील आप कार्यकर्ते आणि दिल्लीवासीयांना उद्देशून पाठवलेला एक संदेश वाचून दाखवला होता. हा संदेश वाचून दाखवताना सुनीता केजरीवाल ह्या अरविंद केजरीवाल ज्या ठिकाणी बसून दिल्लीवासीयांना संदेश देतात त्याच जागेवर बसल्या होत्या. त्यांच्या पाठीमागे तिरंग्यासोबत डॉ. आंबेडकर आणि भगत सिंग यांची छायाचित्रे होती.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आणि अरविंद केजरीवाल यांनी पाठवलेला संदेश ऐकल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे आपलं पद पत्नीकडे सोपवू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. केजरीवाल यांना कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातूनच सरकार चालवणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच केजरीवाल यांच्यावर केवळ आरोप करण्यात आले आहेत. ते एकदम चूक आहेत. अशा परिस्थितीत राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे आपकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, सुनीता केजरीवाल यांनी वाचून दाखवलेल्या संदेशामध्ये अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण देशसेवेसाठी समर्पित राहिलेला आहे. कुठलाही तुरुंग मला फार काळ आत ठेवू शकत नाही. मी लवकरच बाहेर येईन, असा विश्वासही अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.