राजीनामा देऊन IPS बनणार, डॅशिंग पोलीस शिपाई सुनिताने घेतली आयुक्तांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 03:36 PM2020-07-14T15:36:03+5:302020-07-14T16:05:50+5:30
संचारबंदीच्या काळात मंत्र्याच्या मुलाला आणि खुद्द आरोग्यमंत्र्यांना कायदा शिकवणाऱ्या पोलीस एल.आर. सुनिता यादव यांनी पोलीस आयुक्त राजेंद्र ब्रह्मभट्ट यांची भेट घेतली.
सुरत - गुजरातमध्ये लॉकडाऊन काळात संचारबंदी असतानाही वडिलांची गाडी घेऊन बिनधास्त फिरणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या मुलास महिला पोलीस अधिकाऱ्याने चांगलाच धडा शिकवला होता. मात्र, या धाडसी कार्याबद्दल सुनिता यादव यांचे कौतुक करण्याऐवजी, त्यांना पुरस्कार देण्याऐवजी त्यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागतोय, ही अतिशय लाजीरवाणीबाब असल्याचे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी म्हटलं होतं. आता, सुनिता यादव यांनी राजानामा देऊन आयपीएस परीक्षेची तयार करणार असल्याचं म्हटलंय.
संचारबंदीच्या काळात मंत्र्याच्या मुलाला आणि खुद्द आरोग्यमंत्र्यांना कायदा शिकवणाऱ्या पोलीस एल.आर. सुनिता यादव यांनी पोलीस आयुक्त राजेंद्र ब्रह्मभट्ट यांची भेट घेतली. त्यावेळी, मी केवळ माझं कर्तव्य बजावत होते, त्यामुळे माझ्याकडून काहीही चुकीचं घडलेलं नसल्याचं यादव यांनी पोलीस आयुक्तांना सांगितले. तसेच, आता नोकरीचा राजीनामा देऊन आयपीएस अधिकारी बनायचं आहे, त्यासाठी तयारी करणार असल्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. त्यानंतर, पोलीस आयुक्त ब्रह्मभट्ट यांनी सुनिता यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, आपली काही तक्रार असेल, तर लिखीत स्वरुपात देण्याचंही सूचवलं आहे. सुनिता यांच्या राजीनाम्यासंदर्भात अद्याप लिखीत स्वरुपात काहीही मिळालं नसल्याचंही आयुक्तांनी सांगितलं.
गुजरातच्या वरछा येथे आरोग्य राज्यमंत्री कुमार कानाणी यांचा मुलगा प्रकाश आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनिता यादव यांच्यात चांगलीचा बाचाबाची झाली. राज्यमंत्र्यांच्या मुलाने वडिलांच्या पॉवरचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, लॉकडाऊन काळात वडिलांची नेमप्लेट असलेली गाडी घेऊन रस्त्यावर फिरत असल्यामुळे सुनिता यांनी त्यास चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर, थेट आरोग्यमंत्र्यांनाही सुनिता यांनी कायदा हा सर्वाना समान असल्याचे सांगत माझं कर्तव्य करत असल्याचे म्हटले. त्यामुळे, त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ही लज्जास्पद घटना असल्याचे म्हटले होते. तर, सोशल मीडियातूनही सुनिता यादव यांना मोठ्या प्रमाणात नेटीझन्सचा पाठिंबा मिळत होता.
दरम्यान, संचारबंदी असतानाही मास्क न वापरता कारमधून 5 युवकांसह जात असलेल्या प्रकाश आणि त्याच्या मित्रांना सुनिता यादव यांनी अडवले होते. त्यावेळी, प्रकाशने सुनिता यांना वर्षभर याच ठिकाणी ड्युटी लावेल, अशी धमकी दिली. त्यामुळे, संतापलेल्या महिला पोलीस कॉन्टेबल सुनिता यांनी प्रकाशला खडे बोल सुनवाले. पोलिसांची वर्दी तुझ्या बापाची गुलामगिरी करण्यासाठी घातली नाही, असा सज्जड दमच यादव यांनी दिला. अखेर वरिष्ठांशी फोन झाल्यानंतर मी राजीनामा देईन, असे सांगून सुनिता यांनी वाद मिटवला. त्यानंतर, तीन दिवसांनंतर आज सुनिता यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली.