सनी देओलच्या 'गदर २' ची बॉक्स ऑफिसवर धूम, पण २०२४ ची निवडणूक लढवणार का? दिले 'हे' संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 11:58 AM2023-08-18T11:58:28+5:302023-08-18T11:59:34+5:30
या 'गदर २' चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेता सनी देओलच्या निवडणुकीच्या गदरची चर्चा जोरात सुरू झाली आहे.
नवी दिल्ली : हिंदुस्तान जिंदाबाद है.. जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा.. या 'गदर २' चित्रपटातील डायलॉगने पुन्हा एकदा संपूर्ण भारतीय नागरिकांना अक्षरश: वेड लावले आहे. अभिनेता सनी देओलच्या 'गदर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तब्बल २२ वर्षांनंतर पुन्हा एकदा थिएटरमध्ये तीच क्रेझ पहायला मिळत आहे. ११ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या 'गदर २' या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
दरम्यान, या 'गदर २' चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेता सनी देओलच्या निवडणुकीच्या गदरची चर्चा जोरात सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापासून लांब राहण्याचे संकेत सनी देओलने भाजप नेतृत्वाला दिले आहेत. मात्र, या निवडणुकीच्या काळात सनी देओल प्रचारात सहभागी होणार असल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी देओलने म्हटले आहे की, तो अंतर्मुख स्वभावाचा आहेत. म्हणजे, जी व्यक्ती इतरांपेक्षा कमी बोलते किंवा आपले म्हणणे केवळ विशेष व्यक्तीलाच सांगू शकते. तसेच, तो पुढे म्हणाला की, कामाच्या व्यस्ततेमुळे आपल्या मतदारसंघात वेळ देता येत नाही. अशा परिस्थितीत पुढच्यावेळी लोकसभानिवडणूक लढवायची नाही. दरम्यान, सनी देओलच्या या इच्छेनंतर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप अन्य कोणत्याही उमेदवाराला तिकीट देऊ शकते, असे म्हटले जात आहे.
गेल्या वर्षी भाजपने देओलला उमेदवारी दिली होती
सध्या सनी देओल पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपचा खासदार आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनानंतर गेल्यावेळी भाजपने सनी देओलला येथून उमेदवारी दिली. या निवडणुकीत सनी देओल शानदार मतांनी विजयी झाले. दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत विनोद खन्ना यांच्या पत्नीशिवाय त्यांचा मुलगा अक्षय खन्ना यालाही तिकीट देण्याची चर्चा होती. मात्र, नंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का देत भाजपने सनी देओलला येथून उमेदवार घोषित केले होते.
देओल कुटुंबातून तीन जण खासदार झाले आहेत
विशेष म्हणजे, देओल कुटुंबातील तीन सदस्य भाजपच्या तिकीटावर वेगवेगळ्या मतदारसंघातून खासदार झाले आहेत. सनी देओलपूर्वी त्याचे वडील धर्मेंद्र यांनीही राजस्थानमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. तरीही त्यांनी जिंकल्यानंतर पुढची निवडणूक लढण्यास नकार दिला होता. याशिवाय धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आणि प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी सुद्धा भाजपच्या खासदार आहेत. गेल्यावेळी त्या मथुरेतून विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या. त्या भाजपच्या सर्वात मोठ्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत.