मोदींच्या कठोर भूमिकेनंतरही सनी देओल 37 पैकी 28 दिवस गैरहजर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 12:18 PM2019-08-08T12:18:44+5:302019-08-08T12:22:00+5:30
भाजपाच्या तिकिटावर गुरुदासपूर येथून निवडणूक लढवून सनी देओल लोकसभेत पोहोचले. मात्र आता लोकसभेतील अनुपस्थितीमुळे ते चर्चेत आले आहेत.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटींनी प्रतिस्पर्ध्याला नमवत आपली राजकीय इनिंग सुरू केली आहे. बॉलिवूड अभिनेते सनी देओल त्यापैकीच एक आहेत. भाजपाच्या तिकिटावर गुरुदासपूर येथून निवडणूक लढवून सनी देओल लोकसभेत पोहोचले. मात्र आता लोकसभेतील अनुपस्थितीमुळे ते चर्चेत आले आहेत. भाजपाकडून खासदार म्हणून निवडून आलेले सनी देओल लोकसभेत अनेकदा गैरहजर असल्याची माहिती आता समोर आली आहे.
लोकसभेतील पहिल्या अधिवेशनात सनी देओल 37 दिवसांपैकी 28 दिवस गैरहजर होते. पावसाळी अधिवेशनाचे दिवस वाढवल्यानंतर सनी देओल सलग पाच दिवस अधिवेशनाला उपस्थित राहिले होते. मात्र त्यानंतर संपूर्ण एक आठवडा ते गैरहजर होते. पावसाळी अधिवेशनात त्यांनी फक्त 9 बैठकांमध्ये सहभाग घेतला होता. एकंदरीत 37 दिवसांपैकी 28 दिवस सनी देओल गैरहजर होते.
पंजाबमधील गुरुदासपूरमधून दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या जागी भाजपाने अभिनेता सनी देओल यांना लोकसभेसाठी मैदानात उतरवले होते. पुलवामा हल्ल्यानंतर, बालाकोट एअरस्ट्राइक झाल्यानंतर भाजपाने राष्ट्रवाद आणि देशभक्तीचे वातावरण पाहात सनी देओल यांना उमेदवारी दिली होती. सनी देओल यांच्या चित्रपटांमधून ही प्रखर राष्ट्रवादाची भावना दिसते. त्यामुळे सनी देओल यांची ही प्रतिमा त्यांच्या विजयाचे कारण ठरली.
संसदेत गैरहजर राहाणाऱ्या खासदारांची नरेंद्र मोदी यांनी याआधी काही वेळा कानउघाडणी केली होती. संसदेत अधिवेशन सुरू असताना दररोज भाजपाचे किती खासदार, मंत्री सभागृहांत उपस्थित असतात यावर पक्षनेतृत्व बारीक नजर ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. संसद अधिवेशन सुरू असताना दोन्ही सभागृहांत गैरहजर राहणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी भडकले होते. अशा मंत्र्यांची नावे मोदींनी भाजपा नेतृत्वाकडून मागवून घेतली होती.
पंजाबमधील गुरुदासपूरमधून विजय मिळविणारे अभिनेता सनी देओल यांची लोकसभेची खासदारी धोक्यात आली आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा उमेदवारासाठी निवडणुकीत 70 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा घालून दिली आहे. मात्र ही मर्यादा उमेदवाराने पाळली नसल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येते. तर कधी विजयी खासदारचे सदस्यत्व देखील रद्द करण्यात येते. भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सनी देओल यांच्या बाबतीत असच काहीस झालं आहे. लोकसभा निवडणुकीत विजयी उमेदवारीने 70 लाखांहून अधिक खर्च केल्याचे समोर आल्यास त्याचे सदस्यत्व रद्द करून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येते. गुरुदासपूरमधून विजय झालेल्या सनी देओल यांनी निवडणुकीत 86 लाख रुपये खर्च केल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या पर्यवेक्षकांनी सनी देओल यांच्याकडे निवडणूक खर्चाचा तपशील मागितला आहे.