मतदार यादीत मोठा घोळ; सनी लियोनी, कबुतर, हरणही बनले मतदार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 10:02 PM2018-08-23T22:02:19+5:302018-08-23T22:14:32+5:30
मतदार यादीमधून अनेकांची नावे गायब झाल्याचे किंवा मृत व्यक्तींचा मतदार यादीत समावेश असल्याचे अनेकदा निष्पन्न झाले आहे, असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बलिया (उत्तर प्रदेश) - मतदार यादीमधून अनेकांची नावे गायब झाल्याचे किंवा मृत व्यक्तींचा मतदार यादीत समावेश असल्याचे अनेकदा निष्पन्न झाले आहे, असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया येथे मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे दिसत असून, जिल्ह्यातील सदर तालुक्यात मतदार यादीमध्ये सनी लियोनीपासून ते हत्ती, कबुतर आणि हरणांची नावे असल्याचे समोर आले आहे.
येथील मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला असून, अधिकारी मात्र या प्रकारापासून आपला हात झाडत आहेत. बलिया जिल्ह्यात ज्या मतदारांच्या छायाचित्रांसोबत छेडछाड करण्यात आली आहे त्यामध्ये माजी मंत्री नारद राय यांचाही समावेश आहे. त्यांच्या जागी मतदार यादीत हत्तीचे छायाचित्र लावण्यात आले आहे.
या प्रकाराबाबत सदर तालुक्याचे उपजिल्हाधिकारी अश्वनी श्रीवास्तल यांवी सांगितले की हा प्रकार त्यांच्या कार्यकाळापूर्वीचा असून, याआधीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत डेटा एंट्री ऑपरेटवर अशा प्रकारचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपासात सत्य समोर येईल.