Sunrise Over Ayodhya : रामराज्य केवळ हिंदूंपर्यंत मर्यादित नाही, तो एक व्यापक विचार - सलमान खुर्शीद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 10:15 PM2021-11-10T22:15:35+5:302021-11-10T22:15:59+5:30
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांनी नुकतंच आपलं पुस्तक Sunrise over Ayodhya हे प्रकाशित केलं.
Sunrise over Ayodhya Salman Khurshid : माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी नुकतंच आपलं पुस्तक 'Sunrise over Ayodhya' हे प्रकाशित केलं. यानंतर त्यांच्या पुस्तकातील काही भाग चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, सलमान खुर्शीद यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्येच्या निर्णयाचं स्वागत केलं. तसंच निर्णयातील सकारात्मक गोष्टी पाहत आता देश या वादातून पुढे जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
"जे व्हायचं ते होऊन गेलं. हा निकाल आपल्याला एक संधी देत आहे ती आपल्यामध्ये जी दरी निर्माण झाली आहे ती कायमसाठी संपवून टाकावी. या निकालाचे तेच प्रयत्न आहेत," असं सलमान खुर्शीद म्हणाले. आजतकशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. याशिवाय त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्येच्या निर्णयाबाबत अनेक पैलूंवर आपले विचारही व्यक्त केले.
"सार्वजनिक जीवनात देवाण-घेवाणीची स्थिती कायम असते," असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या पुस्तकातील एक भाग 'सॅफ्रन स्काय' याबाबत सुरु झालेल्या वादावरही आपलं मत व्यक्त केलं. "ज्यांना Hinduism माहित नाही ते लोक यावर प्रतिक्रिया देतील, ज्यांना त्याची माहिती आहे ते प्रतिक्रिया देणार नाहीत. ज्यांना हिंदू धर्म, इस्लाम माहित नाही त्यांची वाद काय घालायचा?," असंही त्यांनी नमूद केलं. रामराज्यवर बोलताना त्यांनी हा एक व्यापक विचार आहे आणि या चॅप्टरमध्ये हिंदू धर्माबबत वक्तव्य केलं गेलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
'...तो एक व्यापक विचार'
"रामराज्य केवळ हिंदूंपर्यंत मर्यादित नाही, तो एक व्यापक विचार आहे. जसं रामराज्य आहे तसंच जर तुम्ही इस्लामकडे पाहिलं तर त्यामुळे निजाम-ए-मुस्तफाबद्दल सांगण्यात आलं आहे, हे अगदी तसंच आहे. एकच विचार आहे, एकच मार्ग आहे. आपण केवळ शब्दांमध्ये अडकून राहू नये, यासाठी आम्ही खऱ्यापर्यंत पोहोचू शकू इतकं या पुस्तक कामी यावं," असंही खुर्शीद यांनी नमूद केलं.
"६ डिसेंबर १९९२ रोजी जे काही घडलं ते चुकीचं होतं. ही अशी घटना होती ज्यानं संविधानाला बदनाम केलं. दोन समुदायांमध्ये एक दरी निर्माण झाली. हे चुकीचं होतं. मी १०० वेळा सांगेन हे चुकीचं होतं. जवळपास ३०० जणांना मुक्त करण्यात आलं, जसं कोणी जेसिकाला मारलं नाही, तसंच बाबरी मशीद कोणी उद्ध्वस्त केली नाही," असं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पुस्तकाच्या प्रकाशादरम्यान केलं.