सुपर एक्सक्लुझिव्ह! परीक्षा माफिया, सायबर गुन्हेगारांनी फोडली 'नीट-यूजी'ची प्रश्नपत्रिका 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 09:36 AM2024-06-26T09:36:52+5:302024-06-26T09:37:18+5:30

बिहार पोलिसांच्या ईओयूकडून सीबीआयला महत्त्वाची माहिती

Super exclusive Examination mafia, cybercriminals cracked the question paper of NEET-UG | सुपर एक्सक्लुझिव्ह! परीक्षा माफिया, सायबर गुन्हेगारांनी फोडली 'नीट-यूजी'ची प्रश्नपत्रिका 

सुपर एक्सक्लुझिव्ह! परीक्षा माफिया, सायबर गुन्हेगारांनी फोडली 'नीट-यूजी'ची प्रश्नपत्रिका 

एस.पी. सिन्हा

पाटणा : येथे मंगळवारी पोहोचलेल्या सीबीआयच्या आणखी एका पथकाने पाटण्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक तसेच पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील (ईओयू) अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परीक्षा माफिया व सायबर गुन्हेगारांनी नीट-यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडली ही माहिती यातून सीबीआयला मिळाली. 

नव्या पथकात चार सदस्य आहेत. प्रश्नपत्रिका फुटीसंदर्भात चौकशी करणाऱ्या इओयूने आणखी एका सायबर गुन्ह्याची नोंद केली आहे. झारखंडमधील देवधर येथे अटक करण्यात आलेल्या राजीवकुमार, परमजितसिंह, पंकजकुमारशिवाय के शेखपुरा येथील रंजनकुमारही ईओयूने स गुन्हा दाखल केला. याच सायबर गुन्हेगारांनी नीट-यूजी प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाचा सूत्रधार संजीव मुखियाच्या साथीदारांना मोबाइल व सिम कार्ड उपलब्ध करून दिली होती. त्या मोबाइलवर प्रश्नपत्रिका व उत्तरे पाठविण्यात आली. त्या टोळीतील रंजन या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.

मुखियानेच प्रश्नपत्रिका फोडण्याचा कट आखला
- दि. ५ मे रोजी नीट-यूजी परीक्षेच्या दिवशी संजीव मुखिया बेपत्ता • झाला. तो नालंदाच्या उद्यान महाविद्यालयाचा कर्मचारी आहे. तो या परीक्षेच्या एक दिवस आधीच महाविद्यालयात कामावर आला नव्हता. आपण आजारी असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्याने वरिष्ठांना पाठवून दिले होते. प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने फोडायची व त्यानंतर काय हालचाली करायच्या याचा कट संजीव मुखियाने खूप आधीपासूनच रचला होता.
- बिहार पोलिसांच्या ईओयूने सीबीआयला सदर प्रकरणाबद्दल सुपूर्द केलेल्या अहवालात सर्व आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी ईओयूने गोळा केलेले सर्व पुरावेही सीबीआयला देण्यात आले. त्यामध्ये आरोपींचे मोबाइल फोन, सिमकार्ड, लॅपटॉप, पोस्टडेटेड चेक आदी गोष्टींचा समावेश आहे.

परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी समितीची पालक, विद्यार्थ्यांशी चर्चा
परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी केंद्रीय शिक्षण खात्याने नेमलेल्या समितीने सोमवारी संध्याकाळी झालेल्या पहिल्या बैठकीत पालक व विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा केली. इस्रोचे माजी प्रमुख आर. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सात सदस्यीय समितीने परीक्षांबद्दलचे प्रश्न व आव्हानांवर सविस्तर चर्चा केली. आर. राधाकृष्णन यांनी सांगितले की, परीक्षा पद्धतीत नेमक्या काय सुधारणा करता येतील याबाबत सर्वप्रथम विद्यार्थी, पालकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. 

स्पर्धा परीक्षा पुन्हा सुरळीत सुरू व्हाव्यात, त्यात कोणतेही गैरप्रकार घडू नयेत म्हणून एक यंत्रणा विकसित करण्यासाठी ही समिती विचार करेल. स्पर्धा परीक्षांच्या सध्याच्या स्थितीचा व नॅशनल टेस्टिंग एजन्सीसमोरील आव्हानांचा समितीने आढावा घेतला. प्रश्नपत्रिका फुटू नयेत म्हणून सायबर सुरक्षेची यंत्रणा मजबूत करण्याचाही विचार झाला. परीक्षाविषयक सुधारणा आगामी परीक्षांपासून अमलात येतील, असे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Super exclusive Examination mafia, cybercriminals cracked the question paper of NEET-UG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.