26 बछड्यांना जन्म देणारी सुपर मॉम वाघिण

By admin | Published: April 7, 2017 01:42 PM2017-04-07T13:42:00+5:302017-04-07T13:42:57+5:30

फक्त 12 वर्षांची असणारी ही वाघिण सुपर मॉम ठरली असून आतापर्यंत तिने 26 बछड्यांना जन्म दिला आहे

Super Mom Woman giving birth to 26 calves | 26 बछड्यांना जन्म देणारी सुपर मॉम वाघिण

26 बछड्यांना जन्म देणारी सुपर मॉम वाघिण

Next
>ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 7 - फक्त 12 वर्षांची असणारी ही वाघिण सुपर मॉम ठरली असून आतापर्यंत तिने 26 बछड्यांना जन्म दिला आहे. मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात "कॉलरवाली" नावाने प्रसिद्ध असलेली हा वाघिण सातव्यांदा आई झाली असून तिने चार पिल्लांना जन्म दिला आहे. वन्यजीव तज्ञांनी ही चांगली बातमी असल्याचं सांगितलं आहे. गेल्या काही महिन्यात मध्य प्रदेशात 35 वाघांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही दिलासा देणारी बातमी आहे. 
 
(पेंचमधील वाघिणीची ‘गिनीज बुक’ कडे वाटचाल)
 
पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक शुभरंजन सेन यांनी सांगितलं आहे की, " टी-१५ (कॉलरवाली वाघिणाचा कोड) ने नुकतंच चार पिल्लांना जन्म दिला आहे. या बछड्यांचं वय सध्या तीन महिन्याच्या आसपास आहे. गस्त घालत असताना वाघिणीला बछड्यांसोबत पाहण्यात आलं. पिल्लांना जन्म दिल्यानंतर वाघ आणि इतर धोकादायक गोष्टींपासून त्यांचा बचाव करण्यासाठी वाघिण त्यांना दोन ते तीन महिने गुहेतच लपवून ठेवते". सातव्यांदा आई होणारी आणि इतक्या पिल्लांना जन्म देणारी कॉलरवाली पहिलीच वाघिण असल्याचा अंदाज शुभरंजन सेन यांनी व्यक्त केला आहे.
 
पेंच व्याघ्र प्रकल्पात एकूण 12 वाघिण आहेत. विशेष म्हणजे कॉलरवाली आणि पेंचची राणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या वाघिणीने याआधी 22 बछड्यांना जन्म दिला आहे. पर्यटक आणि वन्यजीव प्रेंमीमध्ये कॉलरवाली अत्यंत लोकप्रिय आहे. आतापर्यंत 26 बछड्यांना जन्म देत कॉलरवालीने नवा रेकॉर्ड केला आहे. 
 
कॉलरवाली वाघिणीने सर्वात आधी 2008 मध्ये तीन बछड्यांना जन्म दिला होता. मात्र 24 दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर 2008 मध्ये तिने चार बछड्यांना जन्म दिला, ज्यामधील तीन वाघ होते. 2008 ते 2013 दरम्यान कॉलरवाली वाघिणीने एकूण 18 बछड्यांना जन्म दिला, ज्यामधील 14 जिवंत राहिले. 2015 मध्ये तिने अजून चार बछड्यांना जन्म दिला. पेंचमध्ये सध्या 50 वाघ आहेत.
 
कॉलरवाली वाघिणीची गिनीज बुकमध्ये नोंद -
मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलात अधिवास करीत असलेल्या टी-१५ (कॉलरवाली) या वाघिणीने 2015 पर्यंत तब्बल २२ बछड्यांना जन्म देऊन वन्यजीव प्राण्यांमध्ये एक नवा विक्रम नोंदविला होता. पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने या ‘टी-१५’ वाघिणीची विशेष दखल घेऊन, तिची गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी, यासाठी अर्ज सादर केल्याची माहिती पुढे आली होती. 
 
माहिती सूत्रानुसार टी-१५ या वाघिणीने मागील २००८ ते २०१५ या काळात सर्व बछड्यांना जन्म दिला होता. जाणकारांच्या मते, वन्यप्राण्यांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या वाघिणीने एवढ्या बछड्यांना जन्म दिल्याची घटना पुढे आली होती. मागील २००५ मध्ये याच जंगलातील बडी मादा या वाघिणीने ‘टी-१५’ हिला जन्म दिला होता. यानंतर काहीच दिवसांत ‘टी-१५’ ही पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनली. बडी मादा या वाघिणीने ‘टी-१५’ सह इरत तीन पिलांना जन्म दिला होता. दरम्यान बीबीसीने त्या बडी मादासह सर्व चारही बछड्यांवर ‘स्पाय इन दि जंगल’ नावाचा लघुपट तयार केला होता. यानंतर ‘टी-१५’ या वाघिणीने २००८ मध्ये सर्वप्रथम तीन बछड्यांना जन्म दिला होता. तेव्हा ती केवळ अडीच ते तीन वर्षांची होती. यानंतर ती २५ मे २००८ रोजी सर्वप्रथम आपल्या बछड्यांसह आढळून आली होती. १० ऑक्टोबर २००८ रोजी ती दुसऱ्यांदा चार छोट्या बछड्यांसह दिसली. यापाठोपाठ २०१० मध्ये तिने पुन्हा पाच बछड्यांना जन्म दिला.
 
एका वर्षांत एखाद्या वाघिणीने पाच पिलांना जन्म दिल्याची ही प्रथमच घटना पुढे आली. यानंतर २०१२ मध्ये पुन्हा तीन, २०१३ मध्ये तीन आणि २०१५ मध्ये चार अशाप्रकारे सहा वर्षांत लागोपाठ २२ पिलांना तिने जन्म दिला.
 

Web Title: Super Mom Woman giving birth to 26 calves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.