दिल्लीहून न्यूयॉर्कला फक्त 6 तासांत पोहोचवणारं सुपरफास्ट विमान
By admin | Published: April 7, 2017 06:07 PM2017-04-07T18:07:51+5:302017-04-07T18:07:51+5:30
बूम सुपरसॉनिक तयार करत असलेलं XB-1 हे विमान जगातील सर्वात वेगवान आणि उंचावर उडणारं विमान असेल
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - जगातील सर्वात वेगवान विमान तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात फंडिंगही मिळाली आहे. जर हे विमान सत्यात उतरलं तर नवी दिल्लीहून न्यूयॉर्कला फक्त सहा तासात पोहोचणे शक्य होणार आहे. सध्या दिल्ली ते न्यूयॉर्क प्रवासासाठी 15 तास लागतात. बूम सुपरसॉनिक तयार करत असलेलं XB-1 हे विमान जगातील सर्वात वेगवान आणि उंचावर उडणारं विमान असेल.
लॉस एंजलिसहून विमानाने उड्डाण केल्यास पुढील सहा तासात ते सिडनीत पोहोचेल. लॉस एंजलिस ते सिडनी विमानप्रवास अत्यंत वेगाने जरी करायचे ठरवले तरी त्यासाठी किमान 15 तास लागतात. इतकाच वेळ नवी दिल्ली ते न्यूयॉर्क प्रवासासाठीही लागतो. पण या वेगवान विमानामुळे ही वेळ अर्ध्यावर येईल आणि फक्त सहा तासात प्रवास पुर्ण होईल.
एवढंच नाही तर तर दिल्लीहून ओमानच्या सलल्लाह शहरात जाण्यासाठी विमानाला जितका वेळ लागतो तितक्या वेळात हे विमान विश्वभ्रमण करुन परतेल.
हे कसं काय शक्य आहे ? असा विचार करत असाल तर तुमच्या माहितीसाठी या विमानाला अशा प्रकारे डिझाईन करण्यात आलं आहे की ते 60 हजार फूट उंचीवरुनदेखील उड्डाण करु शकतं. एका अर्थी या विमानाचा वेग ध्वनीपेक्षाही जास्त असेल. ध्वनीपेक्षा दुप्पट गतीने हे विमान प्रवास करु शकतं. ध्वनीचा वेग ताशी 2335 किमी आहे.
बूम सुपरसॉनिकला नुकतंच 43 मिलिअन डॉलरचं फंडिंग मिळालं आहे. XB-1 च्या निर्मितीसाठी किमान 329 मिलिअन डॉलर्सचा खर्च येईल असा अंदाज आहे. विमान एकदा सेवेत दाखल झालं की तिकीटातून हा सर्व खर्च वसूल करण्याचा प्रयत्न असेल. या विमानात एकूण 45 प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था असेल. या सुपरफास्ट विमानात प्रवास करण्यासाठी 6600 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनातील चार लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
या विमानाचं तिकीट सर्वांच्याच खिशाला परवडेल असं नाही. तिकीट खूप महाग वाटत असलं तरी व्यवसायिकांच्या दृष्टीने ते फायद्याचं असेल. ज्यांच्यासाठी वेळ जास्त महत्वाचा आहे त्यांना हे तिकीट महाग वाटण्याचं कारण नाही. कारण एकाच दिवसात इतक्या लांब जाऊन परत येणं शक्य होत असेल तर कोणताही धनाढ्य व्यवसायिक हा पर्याय नक्की निवडेल.