ग्लॅमरला रामराम करुन 'ही' सुपरमॉडेल उतरली निवडणुकीच्या रिंगणात; सरपंचपदासाठी फिरतेय गावात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 11:18 AM2021-12-16T11:18:25+5:302021-12-16T11:22:36+5:30
Supermodel Aeshra Patel : ग्लॅमरच्या विश्वाला रामराम करत मुंबईतील सुपरमॉडेलने गावची सरपंच होण्यासाठी आता कंबर कसली आहे.
नवी दिल्ली - गुजरातमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम सुरू आहे. राज्यातील तब्बल 6000 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये एका सुपरमॉडेलची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ग्लॅमरच्या विश्वाला रामराम करत मुंबईतील सुपरमॉडेलने गावची सरपंच होण्यासाठी आता कंबर कसली आहे. घरोघरी जाऊन ती मतं मागत आहे. ऐश्रा पटेल (Supermodel Aeshra Patel) असं या सुपरमॉडेलचं नाव असून ती सरपंच होण्याचं स्वप्न पाहत आहे. छोटा उदयपूर जिल्ह्यातील संखेडा तालुक्यात असलेलं कावीठा हे ऐश्राचे गाव आहे.
गावामध्ये सरपंचपद महिलांसाठी राखीव झाले असून या जागेसाठी आता ऐश्रा लढत आहे. ऐश्रा ही मॉडेलिंग क्षेत्रात लोकप्रिय आहे. तिने जवळपास 100 ब्रँड्ससाठी मॉडेलिंग केलेलं आहे. यानंतर आता ती आपल्या गावाच्या विकासासाठी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. "लॉकडाऊन होतं तेव्हा बराच काळ मी गावात राहिले. त्याच दरम्यान, अनेक गावकऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्याकडे उपचारांसाठी पैसेही नव्हते आणि संसर्गाबाबतही त्यांना अधिक माहिती नव्हती. अशावेळी मी माझ्याकडून होणारी मदत गरजूंना केली" अशी माहिती ऐश्रा हिने दिली आहे.
गावची सरपंच होण्यासाठी कसली कंबर
"माझ्या गावातील अनेक गावकरी शेतकरी आहेत. दररोज त्यांच्यापुढे नव्या समस्या असतात. त्यांच्यासाठी आणि त्यासोबत माझ्या गावासाठी काहीतरी करावं, असं मला मनापासून वाटतं आणि म्हणूनच मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गावाचा विकास झाला तरच गावातील लोकांचा विकास होईल, हे मला ठाऊक आहे व त्यादिशेनेच मी चालली आहे" असं देखील म्हटलं आहे. मी अनेक देशांचा प्रवास केला. खूप प्रगती पाहिली. हाच विकास मला माझ्या गावात आणायचा असून त्यासाठी गावकऱ्यांची साथ मागत आहे असं सांगितलं.
"माझ्या गावातील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं"
सध्या जी व्यक्ती गावची सरपंच आहे. त्याने गावासाठी काहीच केलेले नाही. शून्य नियोजन आहे, अशी टीकाही ऐश्राने केली आहे. माझ्या गावातील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. येथील लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा. ज्या लोकांच्या हातात काम नाही त्यांना रोजगार मिळावा असंही ऐश्रा पटेल हिने म्हटलं आहे. सध्या ती घराघकात जाऊन प्रचार करत असून लोक तिला निवडून देतील. तिच्यावर विश्वास ठेवतील अशी आशा तिने व्यक्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.