सुपरमून, चंद्रग्रहण एकाच दिवशी पाहण्याची पर्वणी, चक्रीवादळामुळे अनेकांचा झाला हिरमोड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 06:39 AM2021-05-27T06:39:09+5:302021-05-27T06:39:41+5:30
Supermoon: सुपरमून, ब्लडमून आणि पूर्ण चंद्रग्रहण हे तिन्ही ‘खगोलीय चमत्कार’ एकाचवेळी पाहायला मिळाले. गेल्या सहा वर्षांत सुपरमून आणि पूर्ण चंद्रग्रहण या घटना एकाच वेळी झालेल्या नाहीत.
मुंबई : या वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाच्या निमित्ताने जगभरातील नागरिकांना बुधवारी सुपरमूनचे दर्शन घेता आले. खगोलप्रेमींसाठी बुधवारचा दिवस खास होता, कारण सुपरमून, ब्लडमून आणि पूर्ण चंद्रग्रहण हे तिन्ही ‘खगोलीय चमत्कार’ एकाचवेळी पाहायला मिळाले. गेल्या सहा वर्षांत सुपरमून आणि पूर्ण चंद्रग्रहण या घटना एकाच वेळी झालेल्या नाहीत.
भारतात दुपारी ३.१५ वा. सुरु झालेले चंद्रग्रहण लोकांना सायंकाळी ६.२३ पर्यंत पाहता आले. यातील १४ मिनिटे पूर्ण चंद्रग्रहण पाहता आले. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताघालता पृथ्वी चंद्र व सूर्य यांच्यामध्ये ही ग्रहणाची स्थिती निर्माण होते.
पूर्व आशियातील देश, ऑस्ट्रेलिया तसेच अमेरिकेतील काही भागातील लोकांना पूर्ण चंद्रग्रहण पाहता आले. आकाशातील ढगांमुळे अमेरिकेतही लोकांना हे चंद्रग्रहण नीटपणे दिसू शकले नाही.
पूर्वेकडील राज्यांमध्ये काही भागात, पश्चिम बंगालचा काही भाग तसेच ओडिशाचा काही भाग, अंदमान-निकोबार बेटांवर काही वेळासाठी लोकांना पूर्ण चंद्रग्रहण पाहता आले. हा परिसर वगळता देशाच्या अधिकांश भागात या चंद्रग्रहणाचे दर्शन होऊ शकले नाही. पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यांमध्ये घोंघावत अससेल्या ‘यास’ चक्रीवादळामुळे चंद्रग्रहण दिसण्याची शक्यता फार कमी होती. (वृत्तसंस्था)
ढगाळ वातावरणामुळे अडथळे
मुंबईकरांना सुपरमूनचे दर्शन घेता यावे, यासाठी वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रातर्फे ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु ढगाळ हवामानाने अडथळे आणले. विज्ञान केंद्राचा कार्यक्रम बुधवारी रात्री ८.३० वाजता सुरू झाला; पण विज्ञानप्रेमींना ऑनलाइन पद्धतीनेही सुपरमूनचे दर्शन घेता आले नाही.