Supertech twin towers: 4 टन स्फोटकांचा वापर, अवघ्या 9 सेकंदात जमीनदोत होणार या भव्य इमारती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 03:15 PM2022-03-15T15:15:04+5:302022-03-15T15:15:16+5:30
Supertech twin towers: सुप्रीम कोर्टाने मागच्या वर्षी 31 ऑगस्टला नोएडामधील सुपरटेकच्या एपेक्स आणि सिएन, या दोन इमारती पाडण्याचे आदेश दिले होते.
नोएडा: नोएडातील सुपरटेक एमराल्ड कोर्ट सोसायटीमध्ये बांधलेले बेकायदेशीर ट्विन टॉवर (Supertech twin towers) पाडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता ते पाडण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडाचे बेकायदेशीर सुपरटेक ट्विन टॉवर पाडण्यासाठी 4 टन स्फोटकांचा वापर केला जाऊ शकतो. 22 मे रोजी या 100 मीटर उंच इमारती पाडल्या जाणार असून, फक्त 9 सेकंदात या जमीनदोस्त होतील.
संपूर्ण परिसर रिकामा केला जाईल
22 मे रोजी दुपारी 2:30 वाजता स्फोट केला जाणार असून, यासाठी खबरदारी म्हणून टॉवर्सजवळ राहणाऱ्या सुमारे 1500 कुटुंबांना पाच तासांसाठी बाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे. एडिफिस इंजिनीअरिंगने सांगितल्यानुसार, साइटला लागून असलेला नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेचा एक भाग देखील खबरदारी म्हणून एक तासापेक्षा जास्त काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. हे टॉवर पाडताना मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील. या दोन्ही टॉवरच्या बांधकामादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 31 ऑगस्ट रोजी सुपरटेकचे एपेक्स (100 मीटर) आणि सिएन (97 मीटर) टॉवर पाडण्याचे आदेश दिले होते.
4 टन स्फोटकांचा वापर होणार
नियमांचे उल्लंघन करुन इमारती बांधल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 31 ऑगस्ट रोजी सुपरटेकचे एपेक्स (100 मीटर) आणि सिएन (97 मीटर) हे दोन टॉवर पाडण्याचे आदेश दिले होते. सुप्रीम कोर्टाने या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल नोएडा प्राधिकरणाला कडक शब्दात फटकारले. एडिफिसचे उत्कर्ष मेहता यांनी प्रसारमाध्यमांना सांगितल्यानुसार, आधी 31 मजली रिएनला पाडले जाईल, त्यानंतर 32 मजली एपेक्स कोसळेल. यासाठी 2500 किलोपासून 4000 किलोपर्यंत स्फोटके लागणार आहेत. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ट्रायल ब्लास्ट केले जाईल.