Supertech Twin Towers: भ्रष्टाचाराचे शिखर कोसळले; स्वप्नांचा उडाला धुरळा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 07:13 AM2022-08-29T07:13:43+5:302022-08-29T07:15:30+5:30

Supertech Twin Towers Demolition: नोएडातील सेक्टर ९३ एमधील सुपरटेकचे ट्विन टॉवर भ्रष्टाचारामुळे अनेक वर्षे वादात सापडले होते. अखेर न्यायालयाच्या निर्देशांनंतर ते पाडण्यात आले. मात्र यामुळे ज्या ग्राहकांनी येथे आपल्या स्वप्नातील घर घेण्याचे स्वप्न पाहिले त्यांच्या स्वप्नांचा यावेळी धुरळा उडाला,

Supertech Twin Towers: Peak of Corruption Collapsed; Dreams are shattered... | Supertech Twin Towers: भ्रष्टाचाराचे शिखर कोसळले; स्वप्नांचा उडाला धुरळा...

Supertech Twin Towers: भ्रष्टाचाराचे शिखर कोसळले; स्वप्नांचा उडाला धुरळा...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क : नोएडातील सेक्टर ९३ एमधील सुपरटेकचे ट्विन टॉवर भ्रष्टाचारामुळे अनेक वर्षे वादात सापडले होते. अखेर न्यायालयाच्या निर्देशांनंतर ते पाडण्यात आले. मात्र यामुळे ज्या ग्राहकांनी येथे आपल्या स्वप्नातील घर घेण्याचे स्वप्न पाहिले त्यांच्या स्वप्नांचा यावेळी धुरळा उडाला, ज्यामुळे काही मिनिटे डोळ्यांसमोर फक्त धुळीचे साम्राज्य पसरले होते. ट्विन टॉवर उद्ध्वस्त करण्यासाठी ३७०० किलोपेक्षा अधिक स्फोटकांचा वापर करण्यात आला. यामुळे बाजूच्या इमारतींच्या काचाही काहीकाळ थरथरल्या... 

५०० कोटींचे नुकसान
सुपरटेकचे चेअरमन आर. के. अरोडा यांनी सांगितले की, ट्विन टॉवर इमारती पाडल्याने कंपनीचे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यात इमारतीच्या उभारणीपासून ते जमिनीची खरेदी, नोएडा प्राधिकरणाच्या मंजुरीचे शुल्क, बँकांच्या कर्जावरील व्याज आदींचा समावेश आहे. याशिवाय या टॉवरमध्ये फ्लॅट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १२ टक्क्यांनी व्याज द्यावे लागले आहे. या टॉवरमधील ९०० पेक्षा अधिक फ्लॅटची किंमत ७०० कोटी रुपये होती. ही इमारत पाडणाऱ्या एडिफिस इंजिनिअरिंगला सुपरटेक १७.५ कोटी रुपये देत आहे. 

नियमानुसारच ट्विन टॉवर बांधले गेले : सुपरटेक 
नोएडा विकास प्राधिकरणाने मंजूर केलेल्या बिल्डिंग प्लॅननुसार ट्विन टॉवर बांधले होते आणि त्यात कोणतेही बदल केलेले नाहीत, असे बांधकाम फर्म सुपरटेकने म्हटले आहे.

५०० पोलीस तैनात 
नोएडातील ट्विन टॉवर पाडण्यापूर्वी या भागात ५०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. टॉवरच्या चारही बाजूंनी ५०० मीटरच्या क्षेत्रात प्रवेशबंदी करण्यात आली होती. 

अखेरच्या क्षणी एक  व्यक्ती झोपलेली आढळली 
परिसरातील १५ इमारती रिकाम्या केल्या होत्या. मात्र, अपार्टमेंटमध्ये एक व्यक्ती गाढ झोपेत असल्याची माहिती सुरक्षारक्षकाने दिली. त्यानंतर या व्यक्तीला झोपेतून उठविले आणि टॉवरमधून बाहेर काढले.

‘त्या’ लोकांनी येऊ नये
श्वासाशी संबंधित आजार असलेल्या लोकांनी ट्विन टॉवर पाडलेल्या भागात काही दिवस जाऊ नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. या परिसरात ८० टन ढिगारे साचले आहेत. हवेतही धूळ मोठ्या प्रमाणात आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, या धुळीमुळे दमा आणि हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात. 

181 दिवसांत तयार झाला प्लॅन 
n ट्विन टॉवर पाडण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला त्याचे नाव आहे इम्प्लोजन.  
n या तंत्रज्ञानाचा उपयोग निवासी भागातील गगनचुंबी इमारती पाडण्यासाठी केला जातो. 
n इम्प्लोजन तंत्रज्ञानाने ३२ मजली इमारती केवळ १२ सेकंदांत जमीनदोस्त करण्यात आल्या. मात्र, याची तयारी १८१ दिवसांपासून सुरू होती. 
n या इमारती पाडण्याची जबाबदारी मुंबईच्या एडिफाइस इंजिनिअरिंग आणि दक्षिण आफ्रिकेतील जेट डिमोलिशन्सकडे होती. 
n २१ फेब्रुवारी २०२२ पासून ३५० कामगार आणि १० इंजिनिअर ही इमारत पाडण्याच्या कामात व्यस्त होते, असे यावेळी सांगण्यात आले.

अशी केली तयारी 
इंजिनिअर्सनी ट्विन टॉवरची ब्ल्यू प्रिंट काढली. स्फोटाचे नियोजन आणि त्याचा होणारा परिणाम याचा अभ्यास केला. 
इमारतीचे पिलर्स आणि भिंतीवर ३५ मिलिमीटरची ९,६४२ छिद्रे पाडली. 
भिंतीवर जियोटेक्सटाइल कपडे टाकले. ज्यामुळे ढिगारे पसरले नाहीत. 
नजीकची गॅस पाइपलाइन वाचविण्यासाठी स्टील प्लेटस् टाकण्यात आल्या. 
५. पिलर्स आणि भिंतीत बनविलेल्या छिद्रांत जवळपास ३,७०० किलो स्फोटके लावण्यात आली.

प्राण्यांनाही कोंडले
टॉवर पाडण्यापूर्वी परिसरातील ५ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. यावेळी श्वान आणि इतर प्राण्यांनाही सुरक्षितस्थळी नेण्यात आले होते. टॉवर पाडल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

न्यायालयाचा दणका 
डिसेंबर २०१२ : इमेराल्ड हाउसिंग सोसायटीचे लोक अलाहाबाद हायकोर्टात गेले व असा दावा केला की, गार्डन एरियात २ अवैध इमारती उभारण्यात आल्या आहेत. 
एप्रिल २०१४ : हायकोर्टाने टॉवर्स पाडण्याचे निर्देश दिले, तसेच ज्यांनी फ्लॅट बुक केले त्यांना १४ टक्के व्याजाने रक्कम परत करण्याचे निर्देश दिले. 
३१ ऑगस्ट २०२१ : सुपरटेकला सर्वोच्च न्यायालयातूनही दिलासा मिळाला नाही. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी न्यायालयाने दोन्ही टॉवर पाडण्याचे निर्देश दिले. 
फेब्रुवारी २०२२ : नोएडा प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, टॉवर पाडण्याचे काम २२ मेपर्यंत पूर्ण केले जाईल. 
२८ ऑगस्ट २०२२ : अखेर ट्विन टॉवर पाडण्यासाठी २८ ऑगस्ट २०२२ ही तारीख निश्चित करण्यात आली. 

Web Title: Supertech Twin Towers: Peak of Corruption Collapsed; Dreams are shattered...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.