दहशतवाद्यांना स्नायपरचा पुरवठा; प्रशिक्षण देऊन भारतात घुसखोरी; तणाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 08:02 IST2025-02-18T08:02:17+5:302025-02-18T08:02:35+5:30

एलओसीवर अतिरेकी व पाकिस्तानचे सैनिक स्नायपर रायफलचा खुलेआम वापर करून भारतीय सैनिकांची झोप उडवत आहेत.

Supply of snipers to terrorists; Infiltration into India by training; Tensions increased | दहशतवाद्यांना स्नायपरचा पुरवठा; प्रशिक्षण देऊन भारतात घुसखोरी; तणाव वाढला

दहशतवाद्यांना स्नायपरचा पुरवठा; प्रशिक्षण देऊन भारतात घुसखोरी; तणाव वाढला

सुरेश एस. डुग्गर

जम्मू : आगामी काळात काश्मीरमधील दहशतवादात वेगळे वळण येऊ शकते. कारण घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना स्नायपर रायफल पुरवले जात असून, त्याचबरोबर त्याचे प्रशिक्षण देऊन भारतात घुसखोरी केली जात आहे. मागील काही महिन्यांत दोन स्नायपरला यमसदनी पाठवण्यात आले असून, अनेक रायफल जप्त केल्या आहेत. एलओसीवर घुसखोरांकडूनही अशा रायफल जप्त केल्या आहेत. एलओसीवर अतिरेकी व पाकिस्तानचे सैनिक स्नायपर रायफलचा खुलेआम वापर करून भारतीय सैनिकांची झोप उडवत आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये मागील सात दिवसांत नियंत्रण रेषेपलीकडून झालेल्या स्नायपर गोळीबारात भारताचे तीन सैनिक जखमी झाले. यामुळे सीमेवर तणाव वाढला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीमेवर पाकिस्तानी सैनिकांसमवेत अतिरेकीही भारतीय जवानांना स्नायपरचा निशाणा बनवत आहे. अतिरेक्यांना पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांत स्नायपर चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तथापि, अतिरेक्यांना स्नायपर पुरवण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून निधी पुरवला जात आहे.

पाक सैन्याकडून प्रशिक्षण

पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या अतिरेक्यांना स्नायपरचे प्रशिक्षण दिले जात आहे.

अतिरेक्यांकडे यूएसए व आस्ट्रीयामध्ये निर्मित स्नायपर आहेत. अतिरेकी पाकच्या फॉरवर्ड चौक्यांपर्यंत पोहोचल्याचे दिसते व तेथून पाकिस्तानी सैनिकांबरोबर भारतीय जवानांना लक्ष्य करताना दिसत आहेत.

पीओकेच्या कोटलीमध्ये पाकिस्तानी सैन्याची छावणी आहे. या ठिकाणी लष्कर-ए-तैयबाचे सर्वाधिक अतिरेकी आहेत.

या अतिरेक्यांना स्नायपरचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी आयएसआयकडून निधी दिला जातो.  फॉरवर्ड पोस्टबरोबरच अन्यत्र हल्ले करण्यासाठीही या रायफल वापरल्या जात आहेत.

Web Title: Supply of snipers to terrorists; Infiltration into India by training; Tensions increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.