आॅक्सिजनचा पुरवठा खंडित होऊन ११ रुग्ण दगावले
By Admin | Published: June 24, 2017 02:49 AM2017-06-24T02:49:30+5:302017-06-24T02:49:30+5:30
आॅक्सिजन पुरवठा बंद होऊन एमवाय (महाराजा यशवंतराव) रुग्णालयात ११ लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने शुक्रवारी खळबळ उडाली
इंदौर : आॅक्सिजन पुरवठा बंद होऊन एमवाय (महाराजा यशवंतराव) रुग्णालयात ११ लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने शुक्रवारी खळबळ उडाली. आॅक्सिजन पुरवठा पहाटे १५ मिनिटे बंद झाल्यामुळे या लोकांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे.
एमवायसारख्या मोठ्या रुग्णालयात एवढे रुग्ण दगावणे सामान्य बाब असल्याचे सांगून रुग्णालय प्रशासनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आॅक्सिजनअभावीवा इतर प्रकारच्या निष्काळजीपणामुळे हे मृत्यू झाल्याची शक्यता विभागीय आयुक्त संजय दुबे यांनी फेटाळून लावली. तथापि, आवश्यकता भासल्यास या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे ते म्हणाले. माध्यम प्रतिनिधींनी एकदम एवढे मृत्यू कशामुळे झाले, याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मृतांचे सर्व रेकॉर्ड तसेच आॅक्सिजन पुरवठ्याच्या नोंदी असलेले लॉगबुक बेपत्ता असल्याचे आढळून आले. प्रत्येक ठिकाणचे रुग्णालय अधिकारी काहीही विपरीत घडले नसल्याचे म्हणत होते. मात्र, त्यांनी फाइल्स दाखवल्या नाहीत. रुग्णालयातील काही उच्चस्तरीय सूत्रांनी पहाटे तीन वाजता रुग्णालयातील आॅक्सिजन पुरव ठ्यात व्यत्यय आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. आॅक्सिजन पुरवठा विभागाच्या नोंदी आणि या विभागाचे कर्मचारी नदारद असल्यामुळे नेमके काय घडले, याची माहिती केवळ काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच ठाऊक आहे. मात्र, हे अधिकारी बोलायला तयार नाहीत. त्यामुळे गूढ वाढले आहे.
एमवाय हॉस्पिटल एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असून, दुबे या महाविद्यालयाच्या स्वायत्त कार्यकारिणीचे अध्यक्ष आहेत. कुठेही निष्काळजीपणा झालेला नाही. काही स्थानिक दैनिकांनी चुकीची माहिती प्रसिद्ध केल्यानंतर, मी रुग्णालयाच्या प्रत्येक वॉर्डाला भेट दिली. आॅक्सिजनचा पुरवठा कुठेही खंडित झाला नव्हता. १४०० खाटांच्या रुग्णालयात एवढे मृत्यू ही सामान्य बाब आहे. येथे रोज १०-१२ मृत्यू होतात, असे ते म्हणाले.