अणेंना पाठिंबा म्हणजे खुन्याची पाठ मुख्य न्यायाधीशाने थोपटण्याचा प्रकार - उद्धव ठाकरे
By admin | Published: December 9, 2015 09:48 AM2015-12-09T09:48:22+5:302015-12-09T09:57:28+5:30
स्वतंत्र विदर्भाची मागणी करणा-या भाजप आणि राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणेंवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - स्वतंत्र विदर्भाची मागणी करणा-या भाजप आणि राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणेंवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी श्रीहरी अणेंना दिलेल्या पाठिंब्यावर एखाद्या खुन्याची पाठ मुख्य न्यायाधीशाने जाहीरपणे थोपटण्यासारखाच हा प्रकार असल्याचे सामनाने आपल्या अग्रलेखात म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्र राज्य तोडण्याची भाषा सुरु झाली आहे व अशा तोडफोड प्रवृत्तीच्या मागे उभा रहाण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे.
पाच पती असतानाही भरदरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न झाला. तसे आता महाराष्ट्राच्या अखंडतेबाबत सुरु आहे. विदर्भाच्या हाती संपूर्ण सत्ता असतानाही महाराष्ट्राच्या अखंडतेचा कासोटा फेडण्यासाठी भाजपवाल्यांचे हात शिवशिवत आहेत अशा शब्दात भाजपच्या स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा समाचार घेण्यात आला आहे.
श्रीहरी अणे यांचे समर्थन करणारे आमदार आणि मंत्री विनोद तावडे यांनाही अग्रलेखातून खडेबोल सुनावण्यात आले आहेत. श्रीहरी अणेंमुळेच शिवतीर्थावर दसरा मेळावा झाला असे तावडे म्हणतात. तावडे यांच्यासारख्यांनी मुंबईतून निवडून येऊन हे बोलावे यास काय म्हणावे ? मुंबईच्या हुतात्म्यांचा अपमान करण्याचा हा प्रकार आहे असे अग्रलेखात म्हटले आहे.