स्वराज व राजेंचा राजीनामा घेतल्यास GST ला पाठिंबा- काँग्रेस
By admin | Published: July 1, 2015 09:43 AM2015-07-01T09:43:57+5:302015-07-01T13:07:00+5:30
सुषमा स्वराज व वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याच्या मोबदल्यात जीएसटी विधेयकाला पाठिंबा देण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - ललित मोदीप्रकरणात अडचणीत आलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याच्या मोबदल्यात राज्यसभेत जीएसटी विधेयकाला पाठिंबा देण्याची ऑफर काँग्रेसने भाजपाला दिली आहे.
२१ जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. भाजपाकडे राज्यसभेत बहुमत नसून काँग्रेसने याच मुद्द्यावरुन भाजपाची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेसने भाजपाकडे एक प्रस्ताव पाठवला होता. यात जीएसटी विधेयकाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवण्यात आली, मात्र त्या मोबदल्यात सुषमा स्वराज व वसुंधरा राजे या दोघांचे राजीनामे घ्यावेत अशी अट भाजपासमोर ठेवण्यात आली होती. राज्यसभेत जीएसटीवरील मतदानाच्या वेळी काँग्रेस सभागृहातून वॉकआऊट करेल अशी तयारीही दाखवण्यात आली होती. मात्र भाजपा पक्षश्रेष्ठींनी हा प्रस्ताव धुडकावून लावल्याचे वृत्तात म्हटले आहे. भाजपाने हा प्रस्ताव स्वीकारला तर ललित मोदीप्रकरणातील चुक कबूल केल्याचे स्पष्ट होईल व विरोधकांचे मनोबलही वाढेल असे भाजपा पक्षश्रेष्ठींना वाटते. काँग्रेसने यापूर्वी जीएसटी विधेयकाला प्रखर विरोध दर्शवला आहे.