Kaalicharan : कालीचरणच्या समर्थनार्थ बजरंग सेना रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 09:06 PM2022-01-02T21:06:52+5:302022-01-02T21:19:21+5:30
Kaalicharan : मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये गोरक्षण संघटना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी कालीचरण महाराजाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत छत्तीसगढ सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध नोंदवला.
मुंबई - महात्मा गांधी यांच्याबाबत धर्म संसदेमध्ये अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजाला अखेर पोलिसांनी अटक केली. कालीचरण महाराजने महात्मा गांधींवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. तसेच त्याच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. सध्या, न्यायालयाने त्यास 13 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. मात्र, आता कालीचरणच्या समर्थनार्थही लोक रस्त्यावर उतरत आहेत.
मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये गोरक्षण संघटना आणि बजरंग सेनाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी कालीचरण महाराजाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत छत्तीसगढ सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध नोंदवला. विशेष म्हणजे यावेळी इंदौरमधील रीगल चौकात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोरच विरोध प्रदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचा पुतळा जाळण्यात आला असून मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांच्या नावे कालीचरण महाराजाची लवकरात लवकर सुटका करा, अशी मागणी करणारे निवेदनही छापले आहे. गोरक्षण संघटना आणि बजरंग सेना प्रदेशाध्यक्ष विशाल ठाकूर यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचा पुतळा आम्ही जाळल्याचे सांगितले. इंदौरच्या परदेशीपुरा राजवाडा, रिगल चौक आणि प्रत्येक वार्डाता हा पुतळा जाळण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी मध्य प्रदेशमधील खजुराहो येथून कालीचरण महाराजला ताब्यात घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्यानंतर, न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कालीचरण यास 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. याप्रकरणी, आज न्यायालयात सुनावणी झाली असता त्यास 13 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, 3 जानेवारी रोजी रायपूर कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये दोन दिवसीय धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी परमात्मानंद, संत रामप्रिया दास, संत त्रिवेणी दास, हनुमान गढी अयोध्येचे महंत रामदास, साध्वी विभा देवी, जुना आखाड्याचे स्वामी प्रबोधानंद आणि अकोल्याचे कालीचरण यांच्यासह अनेक संतांनी धर्म संसदेला हजेरी लावली होती. तिथे कालीचरण महाराजाने महात्मा गांधींना शिव्यांची लाखोली वाहिली होती. यावेळी त्याने खालच्या दर्जाचे असे शब्द वापरले आहेत.
गुन्हा दाखल
कालीचरण महाराजाच्या या विधानामुळे वाद पेटला होता. कालीचरण हा फक्त गांधीजींना शिविगाळ करुन थांबला नाही तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचेही त्याने आभार मानले होते. त्याच्या कृतीचं चक्क कौतुक केलं होतं. त्यानंतर कालीचरण महाराज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध टिकरापारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४ आणि ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला होता. रायपुरचे माजी महापौर आणि सभापती प्रमोद दुबे यांनी कालीचरण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.