पंतप्रधान मोदींच्या लाहोर दौ-याचे संघाकडून समर्थन

By admin | Published: January 6, 2016 09:31 AM2016-01-06T09:31:38+5:302016-01-06T10:35:38+5:30

पठाणकोट हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या लाहोर भेटीच्या निर्णयावर टीका होत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदींच्या पाठिशी ठामपणे उभा आहे.

Support from Prime Minister Modi's Lahore tour team | पंतप्रधान मोदींच्या लाहोर दौ-याचे संघाकडून समर्थन

पंतप्रधान मोदींच्या लाहोर दौ-याचे संघाकडून समर्थन

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ६ - पंजाबच्या पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाहोर येथे जाऊन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतल्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत असून त्यांच्या या निर्णयावर सर्व स्तरांतून टीकाही होत आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र पंतप्रधान मोदींच्या पाठिशी ठामपणे उभा असून संघाने त्यांच्या या दौ-याचे समर्थन केले आहे. 'पंतप्रधान मोदींनी लाहोर येथे नवाज शरीफ यांची भेट घेऊन कोणतीही चूक केलेली नाही. पंतप्रधानांनी कोणत्या वेळेसे कोणाला भेटायचं हा त्यांचा विशेषाधिकार असल्याचे सांगत पाकिस्तानसोबत चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत संघाने व्यक्त केले.
२५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी लाहोर येथे जाऊन शरीफ यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अवघ्या आठवड्याभरात पंजाबच्या पठाणकोटमधील भारतीय हवाईदलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला. त्यामुळे मोदींची 'बर्थडे डिप्लोमसी' व्यर्थ ठरल्याचा सूर सर्व स्तरांतून उमटू लागला. मात्र संघाने मोदींना दिलासा देत त्यांचा लाहोर दौरा योग्य असल्याचे सांगत पाकिस्तानशी चर्चा होतच राहिली पाहिजे, अशी भूमिका मांडली. ' पाकिस्तानमध्ये काही भारतविरोधी गट असून ते भारतात दहशतवादी हल्ले करत असतात. त्यांना पूर्वी  पाकिस्तान सरकारचा पाठिंबा असायचा, मात्र आता तशी परिस्थिती दिसत नाही' असे मत संघाचे नेते मा.गो.वैद्य यांनी मांडले. भारताने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे करणे अथवा कोणतीही चर्चा करण्याबद्दल भारतात सर्वसाधारणपणे नकारात्मक वातावरण आहे, याची संघाला कल्पना आहे. मात्र शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करणेही तितकेच महत्वाचे असते, याचीही संघाला जाणीव असून पाकिस्तानसोबतचे सर्व विवाद, कटुता मागे टाकण्याबद्दल संघाने विशेष भर दिला आहे. 
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात संघ-भारतीय जनता पक्षादरम्यान झालेल्या बैठकीनंतर संघाचे नेते दत्तात्रय होसबळे यांच्या विधानामुळे खळबळ माजली होती. ' जशी दोन भावांमध्ये भांडणे होतात, त्याचप्रमाणे कधीकधी भारत-पाकिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये वितुष्ट येते. त्यामुळेच आपल्याशी भौगोलिकदृष्ट्या व इतिहासाद्वारे जोडल्या गेलेल्या देशाशी संबंध कसे सुधारावेत याबाबत आम्ही चर्चा केली' असे होसबळे यांनी म्हटले होते. 
दरम्यान, पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी भारताला अतिशय मजबूत स्थितीत असणे आवश्यक आहे, असे संघाचे मानणे आहे. पाकिस्तानशी होणा-या चर्चेदरम्यान भारताने आपली ताकद व अंतर्गत सुरक्षेशी कोणतीही तडजोड करता कामा नये, असे मतही संघाने नमूद केले आहे. 
शनिवार २ जानेवारी रोजी पहाटे लष्कराच्या वेषात आलेल्या काही दहशतवाद्यांनी पंजाबच्या पठाणकोट येथील हवाई दलाच्या तलावर जोरदार हल्ला चढवत अंदाधुंद गोळीबार केला. एअरबेसवर हल्ला करणारे सर्व सहा अतिरेकी ठार झाले आहेत. मात्र हे ऑपरेशन अद्यापही संपलेले नाही. या हल्ल्यात ७ जवान शहीद झाले तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. 
दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून पठाणकोट येथे हल्ला करणा-याविरोधात कारवाईचे आश्वासन दिले असून अमेरिकेनेही पाकिस्तानला शब्द पाळण्याबाबत बजावले आहे.
 

Web Title: Support from Prime Minister Modi's Lahore tour team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.