संथारा व्रताच्या समर्थनार्थ देशव्यापी धर्म बचाव आंदोलन
By admin | Published: August 25, 2015 03:52 AM2015-08-25T03:52:53+5:302015-08-25T03:52:53+5:30
‘संथारा’ व्रत बेकायदेशीर ठरविणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जैन समाजाने सोमवारी देशभरात मूक मोर्चे काढून आणि बंद पाळून
नवी दिल्ली : ‘संथारा’ व्रत बेकायदेशीर ठरविणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जैन समाजाने सोमवारी देशभरात मूक मोर्चे काढून आणि बंद पाळून जैन धर्माच्या या परंपरेचे समर्थन केले.
भारतीय संविधानात सर्व नागरिकांना पूजा, अर्चना आणि साधना करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे, असे विविध धर्मांच्या नेत्यांनी म्हटले आहे. संथाराच्या समर्थनार्थ जैन समाजातर्फे सोमवारी नवी दिल्लीत एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विविध धर्मांच्या नेत्यांनी भाग घेतला. राजस्थान उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी संथारा ही आत्महत्या असल्याचे नमूद करून त्यावर प्रतिबंध घातला होता, हे येथे उल्लेखनीय आहे.
अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी नवी दिल्ली येथे संथाराच्या समर्थनार्थ देशव्यापी ‘धर्म बचाव आंदोलना’चा शंखनाद केला. भगवान महावीर यांच्यानुसार, संथारा हा जैन साधना पद्धतीचा भाग आहे आणि त्याचा ठाणं, आचारंग, उपसंगदशा आदी आगमोंमध्ये उल्लेख आढळतो. त्यामुळे संथारा हा आत्महत्या आहे असे म्हणता येत नाही, असे मत आचार्य लोकेश मुनी यांनी यावेळी व्यक्त केले.
या सभेला गोस्वामी सुशील महाराज, अखिल इमाम संघटनेचे अध्यक्ष इमाम उमेर इलियासी, विश्व अहिंसा संघाचे संचालक विवेक मुनी, बंगला साहिब गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजितसिंग चंडोक यांनीही मार्गदर्शन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
संथाराच्या समर्थनार्थ आणि राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जैन समाजबांधवांनी सोमवारी राजनांदगाव, इंदूर, बैतूल, शिवपुरी, ग्वाल्हेर, सागरसह संपूर्ण मध्य प्रदेशात मूक मोर्चे काढले.
बैतूल येथे सकल जैन समाजातर्फे या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी सकल जैन समाजने केली आहे. यादरम्यान समाजाच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. शहरातील काही व्यापारी संघटनांनी आपली प्रतिष्ठाने दुपारी १ वाजेपर्यंत बंद ठेवून या मोर्चाला पाठिंबा दिला.
इंदूर येथे सकल जैन समाज धर्म बचाव समितीतर्फे मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी श्वेतांबर आणि दिगंबर समाजाने आपापले व्यवसाय बंद ठेवले होते.
छत्तीसगडच्या बस्तर येथे जैन समाजाने मूक मोर्चा काढून राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला. मोर्चा प्रमुख मार्गावरून कूच करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
राजस्थानमध्येही जैन समाजाने मूक मोर्चा काढून आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून संथारा परंपरेचे समर्थन केले. जयपूर येथील मोर्चात श्वेतांबर आणि दिगंबर पंथाच्या सदस्यांसह हजारो लोक सहभागी झाले होते.