राम रहीम यांचे समर्थक जमा करत आहेत दगड आणि पेट्रोल, चंदिगड आणि हरियाणामध्ये दंगलसदृश्य परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 04:26 PM2017-08-23T16:26:39+5:302017-08-23T16:35:17+5:30
गुरमीत राम रहिम सिंह यांच्याविरोधात करण्यात आलेल्या बलात्कार आरोप प्रकरणी न्यायालय 25 ऑगस्ट रोजी आपला निर्णय सुनावणार आहे
चंदिगड, दि. 23 - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख संत गुरमीत राम रहिम सिंह यांच्याविरोधात करण्यात आलेल्या बलात्कार आरोप प्रकरणी न्यायालय 25 ऑगस्ट रोजी आपला निर्णय सुनावणार आहे. न्यायालयाने निर्णय सुनावण्याआधीच हरियाणा सरकारने राज्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. राज्यामध्ये येणा-या सर्व सीमाही सील करण्यात आल्या आहेत. सरकारने काठ्या, हत्यारं तसंच पेट्रोल घरात ठेवण्यावर बंदी आणली आहे. चंदिगड पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत गरज पडल्यास चंदिगड क्रिकेट स्टेडिअममध्येच कारागृह उभारण्यात येईल असं सांगितलं आहे.
गुरमीत राम रहिम सिंह यांच्यावर एका साध्वीने बलात्काराचा आरोप केला आहे. पंचकुला सीबीआयच्या विशेष न्यायालयात त्यांच्यावर हे आरोप लावण्यात आले आहेत. यापूर्वीही एका साध्वीने त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. सीबीआयचे विशेष न्यायाधीश ए एस नारंग यांच्या समक्ष दुस-या एका साध्वीनेही सिंह यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे म्हटले होते. शुक्रवारी न्यायालय आपला निर्णय देणार आहे. गुरमीत राम रहिम सिंह मुख्य आरोपी आहे. 2007 पासून याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. गुरमीत राम रहिम सिंह यांचे पंजाब आणि हरियाणासहित इतर राज्यांमध्ये लाखो अनुयायी आहेत.
All private & govt schools in #Panchkula to remain shut on Aug 24-25 ahead of Gurmeet Ram Rahim Singh rape case verdict.
— ANI (@ANI) August 23, 2017
निमलष्करी दलाच्या 75 तुकड्या हरियाणामध्ये तैनात करण्यात आलेल्या असून राज्य सरकारने अजून 115 तुकड्या पाठवण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे पंजाबच्या डीजीपींनी राज्यातील सर्व डीआयजी, आयजी आणि एसएसपींना पत्र लिहित डेराशी संबंधित लोक पेट्रोल, डिझेल, दगडं आणि धारदार शस्त्रं जमा करत असल्याचा अलर्ट दिला आहे. चंदिगड आणि हरियाणाला अक्षरक्ष: छावणीचं रुप आलं आहे.
30k+ #DeraSirsa followers have already reached #Panchkula in trucks, trolleys, buses & by foot#DeraSachaSauda#Punjab#Haryana#Chandigarhpic.twitter.com/RyXfkvf4pp
— ChandigarhX (@chandigarh_x) August 23, 2017
संपुर्ण हरियाणात जमावबंदी
हरियाणाचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) राम निवास यांनी संपुर्ण राज्यात 144 कलम लागू करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कायदा-सुव्यवस्थेत अडथळा आणणा-या प्रत्येकाविरोधात कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिली आहे. 'आमच्याकडे पुरेशी सुरक्षा उपलब्ध आहेत. सर्व वाहनांची तपासणी केली जाईल. राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. सोबतच राज्यात रस्त्यावरुन धावणा-या वाहनांवरही आमची नजर असणार आहे', असं त्यांनी सांगितलं आहे. याशिवाय सर्व ठिकाणी क्रेन, अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दल तैनात असणार आहे. तसंच गरज पडल्यास योग्य ते पाऊल उचलण्याचा आदेश संबंधित अधिका-यांना देण्यात आला आहे.
पंजाब पोलीस हाय -अलर्टवर
पंजाबचे डीजीपी हरदिप ढिल्लन यांनी चेतावणी देणारं एक पत्र जारी केलं आहे. यामध्ये डेराचे अनुयायी घरातील ड्रममध्ये पेट्रोल आणि डिझेल भरत असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोबतच घराच्या छपरावर हत्यार आणि दगडं जमा करत आहेत. सर्व पोलीस अधिका-यांनी कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डेराचे दहा लाख अनुयायी चंदिगडमध्ये जमा होऊ शकतात. एवढ्या लोकांना कारागृहात ठेवणं शक्य नसल्याने क्रिकेट स्टेडिअम आणि इतर ठिकाणांचं रुपांतर कारागृहात करण्यात येणार आहे.
होमगार्ड तैनात, सुट्ट्या रद्द
हरियाणा सरकारने कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी होमागार्डलाही कामावर बोलावण्यात आले आहे. तसंच सर्व पोलीस कर्मचा-यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पोलीस राज्यभरात निमलष्करी दलासोबत फ्लॅग मार्च करत आहे.
ज्या स्टेडिअममध्ये कपिल देव यांनी ट्रेनिंग घेतली त्याठिकाणी उभं राहणार कारागृह
इतक्या मोठ्या प्रमाणात येणा-या समर्थकांना ताब्यात ठेवण्यासाठी पोलीस क्रिकेट मैदानात तात्पुरतं कारागृह उभारणार आहेत. सेक्टर 16 मध्ये असणा-या याच क्रिकेट स्टेडिअममध्ये कपिल देव, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी क्रिकेटचे धडे घेतले आहेत. भारताला स्टार खेळाडू देणारं हे स्टेडिअम शुक्रवारी मात्र कारागृह म्हणून आरोपी उभे करताना दिसेल. 1995 रोजी मोहालीत पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम उभं राहिल्यानंतर या स्टेडिअमचं महत्व कमी झालं. या स्टेडिअममध्ये जानेवारी 1985 रोजी पहिला एकदिवसीय सामना आयोजित करण्यात आला होता. 1990 मध्ये एकमेव कसोटी सामना येथे झाला होता. 1985 ते 2007 दरम्यान फक्त पाच एकदिवसीय सामने येथे खेळवले गेले.