Aadhar Verdict: 'या' दोन मराठी न्यायाधीशांचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला 'आधार'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 01:17 PM2018-09-26T13:17:38+5:302018-09-26T13:20:51+5:30
Aadhar Verdict Update: आधार वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला
नवी दिल्ली: आधार कार्ड वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठात चार न्यायमूर्तींचा समावेश होता. विशेष म्हणजे यातील दोन न्यायाधीश हे मराठी आहेत.
दीपक मिश्रा:आधार कार्ड वैध असल्याचा निर्णय देणाऱ्या घटनापीठाचं अध्यक्षपद दीपक मिश्रांकडे होतं. 27 ऑगस्ट 2017 रोजी तत्कालीन सरन्यायाधीश जे. एस. खेहर निवृत्त झाले. यानंतर मिश्रा यांनी सरन्यायाधीशपदाची धुरा सांभाळली. ते देशाचे 45 वे सरन्यायाधीश आहेत. मिश्रा 2 ऑक्टोबर 2018 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयानं दिले. यामध्ये समलैंगिकता आणि आधार कार्डच्या वैधतेचा समावेश आहे. याशिवाय येत्या काही दिवसांमध्ये आणखी महत्त्वपूर्ण निकाल दिले जाणार आहेत.
ए. एम. खानविलकर: अजय माणिकराव खानविलकर यांनी याआधी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिलं आहे. 29 मार्च 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. यानंतर त्यांच्याकडे हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर 2013 मध्ये ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. 13 मे 2016 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.
डी. वाय. चंद्रचूड: धनंजय यशवंत चंद्रचूड यांची 13 मे 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश म्हणून काम पाहिलं आहे. परदेशात शिक्षण घेतलेल्या चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयातून त्यांची कारकीर्द सुरू केली. यानंतर त्यांची देशाच्या अतिरिक्त महाधिवक्तेपदी नेमणूक झाली. त्यांनी अलाहाबादचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम केलं. यानंतर 2016 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.
याशिवाय या घटनापीठात न्यायमूर्ती अशोक भूषण आणि अर्जन कुमार सिकरी यांचाही समावेश होता. त्यांनीही या निकालात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.