सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगावर विश्वास नाही- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 04:51 PM2019-07-31T16:51:26+5:302019-07-31T16:51:42+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राज ठाकरेंनी आज त्यांच्या कोलकात्यातील कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे.
कोलकाताः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राज ठाकरेंनी आज त्यांच्या कोलकात्यातील कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे. त्यानंतर राज ठाकरे आणि ममता बॅनर्जी पत्रकारांना सामोरे गेले आहेत. निवडणुकांमध्ये ईव्हीएम नकोच, बॅलेट पेपरच्याच माध्यमातून निवडणुका घ्या, असं ममता बॅनर्जींनी स्पष्ट केलं आहे.
तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. मी ईव्हीएमची बाजू केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन मांडली, परंतु त्यासंदर्भात कोणतीही पावलं उचलण्यात आली नाही. माझा निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरचा विश्वासच उडाल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर जवळपास दीड महिन्यांनी राज ठाकरे 'पॉलिटिकल पीच'वर उतरले होते. पुढच्या काळात होणाऱ्या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असं निवेदन त्यांनी स्वतः दिल्लीत जाऊन केंद्रीय निवडणूक आयुक्तांना दिलं होतं. तब्बल 14 वर्षांनी ते दिल्लीला गेले होते. या भेटीत त्यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीच्या दिशेनं मनसेनं टाकलेलं पहिलं पाऊल म्हणूनच त्यांच्या या भेटीकडे पाहिलं गेलं होतं. मात्र या घडामोडींनंतर, राज ठाकरे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात असल्याचंही बोललं जात होतं.
ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या, अशी मागणी राज यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी 8 जुलैला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. 'गेल्या 20 वर्षांपासून ईव्हीएमवर शंका घेतली जात आहे. 2014च्या आधी भाजपानंदेखील ईव्हीएमबद्दल संशय उपस्थित केला होता. मात्र 2014 नंतर त्यांचा सूर बदलला,' असं राज ठाकरे म्हणाले होते. मात्र निवडणूक आयोगाकडून आपल्याला शून्य अपेक्षा असल्याचंदेखील त्यांनी बोलून दाखवलं होतं. केवळ औपचारिकता म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचं राज म्हणाले होते. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं ठरेल. निवडणूक आयोगाला भेटलात का?, असं तुम्ही विचाराल म्हणून त्यांची (आयोगाची) भेट घेतल्याचं राज ठाकरेंनी पत्रकारांना सांगितलं होतं.