देशातील 'या' राज्यात सर्वोच्च न्यायालयाने फटाकेविक्रीवर घातली बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 11:41 AM2017-10-09T11:41:26+5:302017-10-09T11:54:58+5:30
सर्वोच्च न्यायालयाने 2016 मधील फटाके विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय पुन्हा लागू करावा यासाठी याचिका दाखल झाली होती.
नवी दिल्ली - दिल्लीकरांना यंदाची दिवाळी ध्वनि आणि प्रदूषणमुक्त साजरी करता येणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने यंदाच्या दिवाळीत दिल्ली आणि नॅशनल कॅपिटल रिजन (एनसीआर) भागात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. येत्या 18 ऑक्टोंबरपासून दिवाळी सुरु होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 2016 सालचा फटाके विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय पुन्हा लागू करावा यासाठी याचिका दाखल झाली होती. ए.के.सिकरी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 6 ऑक्टोंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने मागच्यावर्षी 11 नोव्हेंबरला एनसीआर भागात फटाकेविक्रीचे सर्व परवाने निलंबित केले होते.
यावर्षी 12 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने या बंदी संदर्भात नियम थोडे शिथिल केले होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटाकेविक्रीवर बंदी घालण्याला आपले समर्थन असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. दिवाळी आणि त्यानंतरच्या दिवसात हवाई प्रदूषणामध्ये मोठी वाढ होते. या मोसमात प्रदूषणात वाढ होण्यामागे विविध कारणे आहेत त्यात फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण हे सुद्धा एक कारण आहे असा युक्तीवाद वकील गोपाळ शंकरनारायण यांनी केला. ते अर्जुन गोपाळ यांच्यावतीने युक्तीवाद करत होते. दिल्ली पोलिसांनी दुकानदारांना जारी केलेले फटाकेविक्रीचे परवानेही सर्वोच्च न्यायालयाने निलंबित केले.