बीसीसीआयला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
By admin | Published: October 18, 2016 05:01 PM2016-10-18T17:01:21+5:302016-10-18T17:06:47+5:30
लोढा समितीच्या शिफारशींचा पुनर्विचार करण्यासाठी बीसीसीआयने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - लोढा समितीने केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीवरून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईत सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला पुन्हा एकदा जबरदस्त दणका दिला आहे. लोढा समितीच्या शिफारशींचा पुनर्विचार करण्यासाठी बीसीसीआयने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.
बीसीसीआयच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी लोढा समितीने केलेल्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने 18 जुलै रोजी स्वीकारून त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र बीसीसीआयने अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित करत या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत चालढकल सुरू केली होती.
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही बीसीसीआयविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी बीसीसीआयचे वकील कपिल सिब्बल यांनी लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी सदस्यांचे मन वळवण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारशींबाबत बीसीसीआयने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता.