“सुप्रीम कोर्ट ‘तारीख पे तारीख’ न्यायालय होऊ नये, हीच इच्छा”; CJI चंद्रचूड यांची ‘मन की बात’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 03:26 PM2023-11-03T15:26:30+5:302023-11-03T15:29:34+5:30
Supreme Court CJI DY Chandrachud: याचिकांच्या सुनावणीवर पडणाऱ्या तारखांबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी चिंता व्यक्त केली.
Supreme Court CJI DY Chandrachud:महाराष्ट्राचा राजकीय संघर्ष, आमदार अपात्रता, मणिपूर हिंसाचार यांसह अनेक महत्त्वाच्या याचिकांवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठांसमोर सुनावणी सुरू आहे. सडेतोड विधाने आणि स्पष्ट भूमिकेमुळे चंद्रचडू यांची एक वेगळी प्रतिमा देशासमोर आहे. देशातील न्यायालयांमध्ये कोट्यवधी प्रकरणे प्रलंबित आहेत. याचिकांवर सातत्याने पडणाऱ्या तारखांवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी चिंता व्यक्त केली असून, सर्वोच्च न्यायालय हे तारखांवर तारखा मिळणारे न्यायालय होऊ नये, अशीच इच्छा आहे, असे चंद्रचूड यांनी नमूद केले.
जोपर्यंत आत्यंतिक आवश्यकता नसेल, तोपर्यंत ते प्रकरण स्थगित करावे किंवा पुढील तारीख घेऊ नये, अशी आग्रही सूचना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलांना केली आहे. गेल्या दोन महिन्यांत वकिलांकडून ३ हजार ६८८ याचिकांसाठी पुढील तारीख मिळावी, यासाठी विनंती करण्यात आली, अशी माहिती चंद्रचूड यांनी दिली. सर्वोच्च न्यायालय हे तारीख पे तारीख असे न्यायालय होऊ नये, अशी मनापासून इच्छा आहे, याचा पुनरुच्चार चंद्रचूड यांनी केला.
सुनावणी लांबवू नका किंवा टाळू नका
सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल होण्यापासून ते प्रथमच सुनावणीसाठी येईपर्यंत किमान वेळ लागेल याची खात्री करण्यासाठी या प्रक्रियेवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे, अशी माहिती चंद्रचूड यांनी यावेळी दिली. प्रकरणांची सुनावणी टळली किंवा लांबली तर मग सुनावणी लवकर घेण्याचा हेतूच अपयशी ठरतो. जर तारीख पे तारीखच मिळत राहिली तर लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल. जर गरज नसेल तर पुढची तारीख देऊ नका, सुनावणी लांबवू नका किंवा टाळू नका, असे आवाहन चंद्रचूड यांनी केले.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात २३६१ प्रकरणं अशी आहेत ज्यामध्ये पुढची तारीख मागण्यात आली आहे. अशा प्रकारची मागणी करणं हेच चुकीचं आहे. अशा प्रकारे तारखाच पडत राहिला तर लोक न्यायालय म्हणून आपल्यावर विश्वास कसा काय ठेवतील? असा सवाल चंद्रचूड यांनी केले. दुसरीकडे, याआधीही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी तारखा पडण्यावरुन एका वकिलाला खडेबोल सुनावले होते.